जर्मनीच्या नव्या राजदुतांनी घेतली राज्यपालांची भेट
जर्मनीचे भारतातील नवनियुक्त राजदूत वाल्टर लिंडनर यांनी गुरुवारी (दि. ६) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षा एंजेला मर्केल नोव्हेंबर महिन्यात भारत भेटीवर येत असून त्यावेळी त्या मुंबईला देखील भेट देणार असल्याची माहिती लिंडनर यांनी दिली.
भारत आणि जर्मनी या देशांमधील संबंध परस्पर विश्वासावर आधारित असून आगामी काळात ते अधिक वृद्धिंगत होतील असा विश्वास लिंडनर यांनी व्यक्त केली.
जर्मनी भारताला गंगा शुद्धीकरण, नूतनीकरणक्षम उर्जा, कृषी, युनेस्को –प्रणित व्याघ्र संवर्धन, इत्यादी अनेक विषयांवर सहकार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जर्मनी – भारत संबंध अधिक व्यापक होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना जर्मनीने महाराष्ट्रातील विद्यापीठांशी, विशेषतः संस्कृत विद्यापीठाशी सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत जूर्गन मॉर्हार्ड यावेळी उपस्थित होते.