बंद

    ०४.०१.२०२० कंपनी सचिवांनी जीवनमूल्यांवर आधारित काम करावे – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: January 4, 2020

    कंपनी सचिवांनी जीवनमूल्यांवर आधारित काम करावे – राज्यपाल

    कंपनी सचिवांनी आपल्या औद्योगिक संस्थेला जीवनमूल्यांवर आधारित योग्य सल्ला देऊन देशाच्या आर्थिक उन्नतीत सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा आयोजित कॉर्पोरेट कंपनी सचिवांच्या पहिल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

    राज्यपाल पुढे म्हणाले, देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी कंपनी सचिवांचे मोठे योगदान असणार आहे. कंपनी सचिव हा अष्टावधानी असावा. त्याने नवे कौशल्य आत्मसात करीत स्वत:ला सातत्याने अपडेट ठेवणे आवश्यक आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेतून चांगले विचार मंथन होऊन भावी पिढीला दिशा देणारे मार्गदर्शन या माध्यमातून व्हावे अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.

    यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजीत पाण्डेय, यांच्यासह प्रवीण सोनी, आशिष गर्ग, आशिष दिक्षीत श्री. कनोडीया यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

    भारतीय कंपनी सचिव ही राष्ट्रीय संस्था 51 वर्षांपासून या क्षेत्रात कार्य करीत आहे. चेन्नई , कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली येथे या संस्थेचे क्षेत्रीय कार्यालय आहेत. याशिवाय नवी मुंबई आणि हैद्राबाद येथे कार्पोरेट गव्हर्नन्स संशोधन व प्रशिक्षण संस्था आहेत. देशात 73 ठिकाणी आणि परदेशात दुबई व न्युयॉर्क येथे संस्थेच्या शाखा आहेत. कंपनी सचिव क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी मार्गदर्शन करणारी ही अग्रगण्य संस्था आहे. सुमारे 58 हजार प्रशिक्षक असलेल्या या संस्थेमार्फत साडेतीन लाख विद्यार्थी कंपनी सचिवपदासाठी आवश्यक प्रशिक्षण घेत आहेत.

    ००००