बंद

    इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या अंधेरी शाखेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते संपन्न

    प्रकाशित तारीख: September 1, 2018

    राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज (१ सप्टे.) राजभवन येथून इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या अंधेरी शाखेचे उद्घाटन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पोस्ट खात्याच्या “आर्थिक समावेशन” या विषयावरील विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच पोस्टाच्या पाच खातेधारकांना बँकेच्या क़्युआर कार्डचे वाटप करण्यात आले.

    एकशे पासष्ट वर्षांची गौरवशाली परंपरा असलेले पोस्ट खाते भारतीय लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असून विश्वास, पारदर्शकता व लोकसेवा ही पोस्ट खात्याची वैशिष्टे आहेत. देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणारी ही संस्था असून पोस्ट पेमेंटस बँकेमुळे बँकिंग सेवा देखील सामान्य लोकांच्या दारात पोहोचतील, असा विश्वास राज्यपालांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. पोस्ट पेमेंटस बँकेमुळे लोकांना अनेक बिले घरबसल्या भरता येईल, असे देखील राज्यपालांनी सांगितले.

    कार्यक्रमाला खासदार गोपाल शेट्टी, मुंबई परिक्षेत्राचे प्रधान पोस्ट मास्तर जनरल गणेश सावलेश्वरकर, पोस्टसेवा मुख्यालय येथील निदेशक सुमिता अयोध्या, डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.