समर्पणवृत्ती आणि दृढनिश्चय ही यशाची गुरूकिल्ली – राज्यपाल
समर्पणवृत्ती आणि दृढनिश्चय ही यशाची गुरूकिल्ली – राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी
कोल्हापूर, दि. २ फेब्रुवारी: स्वयंशिस्त, समर्पणवृत्ती आणि दृढनिश्चय या बळावरच विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठता येणे शक्य आहे. या गोष्टींच्या बळावरच हायस्कूलपर्यंत अनवाणी पायाने हिंडणारा माझ्यासारखा एक मुलगा राज्यपाल पदापर्यंत पोहोचू शकला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५६ व्या दीक्षांत समारंभामध्ये अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, जन्मदात्री माता, मातृभाषा, मातृभूमी आणि निसर्गमाता या चार मातांचा प्रत्येक मनुष्याने आपल्या आयुष्यात सदैव आदर केला पाहिजे. त्यांचे ऋण फेडण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. जन्मदात्रीबरोबरच प्रत्येकाने मातृभाषेचा उचित अभ्यास, सन्मान आणि गौरव करणे आवश्यक आहे. मातृभूमीचे ऋण चुकविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. मात्र, या सर्वांहूनही अधिक आपण आपल्या निसर्गमातेचा आदर, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सातत्याने कार्यरत असले पाहिजे. कारण या मातेचे अस्तित्व धोक्यात आले, तर उर्वरित तीन मातांचे अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहात नाही. त्यामुळे पर्यावरण, जीवसृष्टी, वनस्पती यांच्या संवर्धनाचा प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. जागतिक तापमानवाढीचा मोठा धोका संभवत असल्यामुळे पुढील काळामध्ये पर्यावरणाच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास मानवास फार मोठ्या हानीस सामोरे जावे लागेल. त्यामुळे स्वच्छता, प्लास्टीकमुक्ती या सवयी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनल्या पाहिजेत. स्वच्छता आणि प्लास्टीकमुक्तीच्या संदर्भात कोल्हापूर शहराने राज्यात आदर्शवत स्वरुपाचे कार्य करून दाखवावे, असे आवाहनही कुलपती कोश्यारी यांनी यावेळी केले.
विद्यार्थी आणि समाजास अनुरूप असे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी सज्ज राहिले पाहिजे. त्यामुळे देशामध्ये बेरोजगारीची समस्या कोठेही उद्भवणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या कामाप्रती उच्चप्रतीची निष्ठा बाळगल्यास राज्यपाल, पंतप्रधान काय, अगदी राष्ट्रपतीही होणे शक्य आहे. केवळ त्यासाठी मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
—