मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी केले क्लस्टर विद्यापीठाचे उदघाटन
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी केले क्लस्टर विद्यापीठाचे उदघाटन
उत्कृष्ट शिक्षण संस्थांनी सेंटर ऑफ एक्सलंन्स होण्याचा प्रयत्न करावा: राज्यपाल
पूर्वीच्या शिक्षण पध्दतीमध्ये संशोधनाला महत्व होते परंतु एकविसाव्या शतकात संशोधनाला अविष्कार, नाविन्य तसेच उष्मायनाची (incubation) जोड देणे आवश्यक झाले आहे. यादिशेने शिक्षण संस्थांनी कार्य करुन सेंटर ऑफ एक्सलंस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच. आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टिचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एच.एस.एन.सी) समूह विद्यापीठाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी (दि. ११) व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
उदघाटन सोहळयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, समूह विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी, हैद्राबाद सिंध महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विद्यापीठ संस्थामधील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
आज आपण कृत्रीम बुध्दीमत्तेच्या युगात जगत आहोत. यावेळी भारताचा समृध्द वारसा असलेली आध्यात्मिक बुध्दीमत्ता देखील तितकीच महत्वाची आहे. या आध्यात्मिक ज्ञानाच्या तसेच योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वत: मध्ये असलेले पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
एचएसएनसी विद्यापीठ देशातील सर्व समूह विद्यापीठांकरिता मार्गदर्शक सिध्द होईल अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
“मुख्यमंत्री झालो नसतो तर कलाकार झालो असतो”
नवे समूह विद्यापीठ पारंपारिक शिक्षणासोबत संगीत, नृत्य, कला इत्यादी विषयांचे शिक्षण घेण्याची संधी देणार असल्याबददल विद्यापीठाचे अभिनंनदन करुन जीवनात कला फार महत्वाची आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
“आपण मुख्यमंत्री झालो नसतो, तर नक्कीच एक कलाकार झालो असतो; किंबहुना आपण कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री आहोत”, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले
शिक्षण जीवनावश्यक गोष्ट आहे, असे सांगून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थीतीमध्ये देखील विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरत सुरुच राहिले पाहीजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यानी केले.
आगामी काळात शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करावे लागतील, असे सांगुन सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट चे रुपातंर विद्यापीठात करण्याच्या दृष्टीने शासन विचार करीत असल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यानी यावेळी सांगितले.
एच.एस.एन.सी क्लस्टर विद्यापीठ विद्यार्थ्यांना कौशल्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करील असे निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या संकेत स्थळाचे उदघाटन करण्यात आले.
विद्यापीठ विश्वस्तांनी घेतली राज्यपालांची भेट
निरंजन हिरानंदानी यांच्या नेतृत्वाखाली नव्या विद्यापीठाचे विश्वस्त व प्राचार्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बुधवारी राज भवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते “सेफ्टी नॉर्म्स इन पोस्ट कोविड-19 या नियतकालीकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हैद्राबाद सिंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विश्वस्त अनिल हरीश, प्राचार्या डॉ हेमलता बागला आदि उपस्थित होते.