फ्रांसच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
फ्रांसच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत श्रीमती सोनिया बार्ब्राय यांनी बुधवारी (दिनांक १३) राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
भरतनाट्यम, योगशास्त्र, ध्रुपद गायन, भारतीय तत्वज्ञान व हिन्दी भाषेच्या अभ्यासक असलेल्या सोनिया बार्बाय यांनी फ्रांस व भारताचे संबंध अतिशय व्यापक, घनिष्ट व प्रामाणिक असल्याचे यावेळी सांगितले.
दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये फ्रांस भारताच्या बाजूने भक्कमपणे उभा असल्याचे सांगतानाच सामरिक सुरक्षा, अणुऊर्जा निर्मिती यांसह अनेक क्षेत्रात फ्रांस भारताला सहकार्य करीत असल्याचे सोनिया बार्ब्राय यांनी संगितले.
महाराष्ट्रात दासाल्ट, सनॉफी, जैतापुर येथील अणुऊर्जा निर्माण प्रकल्प यांसह ५५० फ्रेंच कंपन्या कार्यरत असून त्यातून ३.६ लाख लोकांना रोजगार मिळत आहे, असे त्यांनी संगितले. नागपुर तसेच पुणे येथील मेट्रो प्रकल्पामध्येदेखील फ्रेंच कंपनी आर्थिक सहकार्य करीत असल्याचे त्यांनी संगितले.
शिक्षणक्षेत्रात फ्रांसला भारताशी सहकार्य वाढवायचे असून फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूएल मॅक्रोन यांनी २०२० पर्यंत दहा हजार भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी फ्रांसमध्ये यावेत, असे उद्दीष्ट ठेवले असल्याचे त्यांनी संगितले. गेल्यावर्षी एकट्या मुंबईतील दूतावासातून १७००० भारतीयांना फ्रांसचा व्हिजा देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
फ्रांसने महाराष्ट्रातील विद्यापीठांशी आणि विशेषतः संस्कृत विद्यापीठासोबत सहकार्य वाढवावे, अशी सूचना राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी केली.