Close

    रामायणामुळे नवीन पिढीचे विचार, आदर्श आणि चरित्र आकाराला येणार – राज्यपाल

    Publish Date: February 25, 2019

    वृ.वि.640

    माघ शुक्ल-19 1940 (रात्रौ. 8.50 वा.)

    दि. 25 फेब्रुवारी 2019

    आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ

    रामायणामुळे नवीन पिढीचे विचार, आदर्श आणि चरित्र आकाराला येणार.

    – राज्यपाल

    मुंबई दि. २५ : रामायण हे भारतीय जीवनमुल्यांचे एक सार असून रामायण प्रेम, आदर, आज्ञाधारकता, सत्य आणि त्यागाची कथा आहे. असत्यावर सत्याचा विजय सिद्ध करणारी महागाथा असलेल्या या महाकाव्यामुळे नवीन पिढीचे विचार, आदर्श आणि चरित्र आकाराला येईल, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.

    पर्यटन विभागाच्यावतीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, यावेळी राज्यपाल बोलत होते. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद – सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्यासह कंबोडीया, फिलीपाईन्स आणि इंडोनेशिया येथील आमंत्रित उपस्थित होते.

    यावेळी राज्यपाल म्हणाले, रामायणाचे मूल्य प्रत्येक भारतीयांच्या डीएनएचा एक भाग बनले आहे. बौद्ध, शीख आणि जैन याव्यतिरिक्त विविध भारतीय भाषांमध्ये रामायणाचे अनेक भाषांतरे आहेत. कंबोडियन, इंडोनेशियाई, फिलिपिनो, थाई, लाओ, बर्मा आणि मलेशियन आवृत्ती रामायण आणि तिच्याशी संबंधित कथा देखील आपल्याला पाहायला मिळतात. रामायण ही एक अशी कथा आहे जी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये, बऱ्याच परदेशी भाषा आणि बऱ्याच बोलीभाषांमध्ये सांगितली जात आहे. रामायण इंग्रजी, जर्मन, फ्रेंच आणि इतर परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती आणि मूल्यांकडे जगभरातील अनेक विद्वान, दार्शनिक आणि विचारवंतांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे राज्यपाल यांनी याप्रसंगी सांगितले.

    आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवात सहभागी होणाऱ्या राष्ट्रांसह मूल्यांचा आणि सांस्कृतिक सादरीकरणाचा वापर करून भारत आपल्या ऐतिहासिक दुव्यांचे पुनरुज्जीवन करीत आहे. हजारो वर्षांपासून रामायणाने संस्कृती, धर्म क्षेत्राच्या सीमा पार केल्या आहेत. रामायण हे आजच्या पिढीशी सुसंगत असल्याने महाराष्ट्रातील विद्यापीठांनी रामायण आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वास्तूंचा अभ्यास करण्याचे आवाहन राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी यावेळी केले.

    यंदा आपण महात्मा गांधी यांचे १५० वे जयंतीवर्ष साजरे केले. ‘द स्टोरी ऑफ माय एक्सपिरिमेंट विथ ट्रुथ’ या त्यांच्या आत्मचरित्रात महात्मा गांधी यांनी रामायणाने आपल्या जीवनात प्रभाव टाकला असल्याचे नमूद केले आहे. स्वामी विवेकानंद यांनी १९०० साली कॅलिफोर्नियामध्ये रामायण विषयावर भाषण दिले होते. या भाषणादरम्यान विवेकानंदांनी रामायणाला भारताचा महान महाकाव्य म्हणून वर्णन केले असल्याचे आढळते.रामायण ग्रंथात भारताचा महान सांस्कृतिक शिष्टाचार, रीतिरिवाज, समाज सामावला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दोन वर्षांपूर्वी, जेव्हा भारतचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३१ व्या आशियाई शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मनिला येथे गेले होते, तेव्हा फिलीपिन्समधील एक तुकडीने राजा रावण; आधारित राम हरी कार्यक्रम सादर केला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फिलिपिनो कलाकारांनी केलेल्या सुंदर प्रदर्शनाने प्रभावित झाले असल्याचे राज्यपाल यांनी सांगितले.

    रामायण महोत्सवाच्या माध्यमातून सर्व देशांना एकत्रित आणून त्यामाध्यमातून फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. रामायण हा फक्त ग्रंथ नसून भारतीय जीवनमुल्यांचा तो एक सार आहे. भारतासह अनेक देश रामायणाशी जोडले गेले आहेत. रामायण महोत्सवाच्या माध्यमातून या सर्व देशांना एकत्रित आणणे तसेच देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाला चालना देणे असे उद्देश साध्य होतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

    कंबोडियाच्या रॉयल बॅलेट, इंटिग्रेटेड परफॉर्मिंग आर्ट गिल्ड, फिलीपिन्स, सांगर परिपूर्ण, इंडोनेशिया आणि भारतातील गणेश नाट्यालय रामायण महोत्सवाच्या पुढील चार दिवसांमध्ये रामायणची खास आवृत्ती सादर करणार आहेत त्याबद्दल त्यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले.

    भारत, श्रीलंका आणि महाराष्ट्रात भगवान राम यांच्या जीवनाशी संबंधित अनेक ठिकाणे आहेत. पर्यटन विभागाने या ठिकाणाविषयी जागरुकता निर्माण केली पाहिजे आणि इतर राज्यांशी संबंधित रामायण सर्किट विकसित करण्याची अपेक्षाही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

    पर्यटनमंत्री रावल यावेळी म्हणाले, आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवामुळे रामायणातील मूल्यांची माहिती जगभरातील लोकांना आणि नव्या पिढीला होणार आहे. रामायणातून आपल्याला जीवनमूल्यांची ओळख तर होतेच, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव,स्वार्थविरहीत जीवन जगण्याची प्रेरणाही मिळते. या महोत्सवामुळे देशभरातील रामायण सर्किटच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवात सध्या चार देश सहभागी झाले आहेत. विविध देशांना एकत्र आणण्यात रामायण महोत्सव महत्वाची भूमिका पार पाडेल, असे पर्यटन मंत्री यांनी सांगितले. पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

    भारतासह कंबोडीया, फिलीपाईन्स आणि इंडोनेशियाचा महोत्सवात सहभाग

    पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत बांद्रा कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव होणार असून यात भारतासह कंबोडीया, फिलीपाइन्स आणि इंडोनेशियातील कलाकार सहभागी होणार आहेत. त्या-त्या देशातील विविध स्वरूपांतील रामायणाचे सादरीकरण करणार आहेत. आज शुभारंभप्रसंगी भारतातील गणेश नाट्यालय संस्थेने रामायण सादर केले. उद्या, २६ फेब्रुवारी रोजी कंबोडीयातील रॉयल बॅलेट ऑफ कंबोडीया आणि कोम्मा बसाक असोसिएशन, २७ फेब्रुवारी रोजी फिलीपाईन्समधील इंडीग्रेटेड परफॉर्मिंग आर्टस् गील्ड तर २८ फेब्रुवारी रोजी इंडोनेशियातील संगार परिपूर्णा हे ग्रुप या रामायण महोत्सवात सादरीकरण करणार आहेत.