Close

    मुंबईने आर्थिक व तंत्रज्ञान क्षेत्रात जगाची राजधानी व्हावे – राज्यपाल

    Publish Date: March 1, 2019

    महान्यूज

    मुंबईने आर्थिक व तंत्रज्ञान क्षेत्रात जगाची राजधानी व्हावे – राज्यपाल

    ‘फिनटेक कॉन्क्लेव्ह: फिन्टीग्रेट झोन १९’ कार्यक्रमाचा राज्यपालांच्या उपस्थितीत समारोप

    मुंबई, दि. १ : आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून येत्या काळात मुंबईने तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात जगाची राजधानी व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘फिनटेक कॉन्क्लेव्ह: फिन्टीग्रेट झोन १९’ या कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.

    मुंबई फिनटेक हब (महाआयटी) झोन, स्टार्ट अप इंडिया आणि फिन्टिग्रेट झोन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सिंगापूर, इंग्लड, कॅनडा आदी देशातील प्रतिनिधी, नव उद्यमी (स्टार्ट अप्स) यामध्ये सहभागी झाले होते. बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक व्यवहाराविषयी तीन दिवसीय परिषदेत माहिती देण्यात आली.

    यावेळी नवउद्यमींना प्रत्येकी दहा लाखांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. फिनटेक इकोसिस्टम लँडस्केप अहवालाचे अनावरणही करण्यात आले.

    राज्यपाल म्हणाले, मुंबईने मागील साडेतीनशे वर्षांत अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहे. कापड निर्मिती, वस्रोद्योग, कारखानदारी आदी उद्योगातून मुंबईने आपली प्रगती साधली आहे. मुंबईची लोकसंख्या १० हजार होती. आता १३ मिलियन झाली आहे, असे असेल तरी मुंबईची आर्थिक प्रगती झपाट्याने सुरूच आहे.

    मुंबई उद्योग व्यापारासाठी ओळखली जात होती. इंग्लडमधून कापसाची मागणी वाढल्यानंतर मुंबई कापूस निर्यात करणारे प्रमुख शहर बनले. यानंतर मुंबई वस्रोद्योगाचे केंद्र बनले. यातून अनेकांना रोजगाराची संधी मिळाली. २० व्या शतकापासून मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपास आली.

    मुंबईत प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती आणि व्यापार करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. सध्या सर्व प्रमुख आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबई परिसरात सुरू आहेत. यामध्ये मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व्ह बँक, सेबी आदी संस्था मुंबईत कार्यरत आहेत. थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात मुंबई आघाडीवर आहे. देशाच्या प्रगतीचे द्वार म्हणून मुंबईकडे पाहिले जात आहे. हिच मुंबई पुन्हा कात टाकत आहे. वाढती स्पर्धा आणि निकड याबाबीमुळे मुंबईमध्ये आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्र वाढीसाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे.

    राज्य शासनाने २०१८ मध्ये पुढाकार घेऊन देशातील पहिले फिनटेक धोरण आणले. वर्षभरात या विभागाने झपाट्याने प्रगती केल्याचे दिसत आहे. फिनटेकमुळे अनेक कामे वेगाने मार्गी लागले आहेत. शासन आणि नवीन फिनटेक उद्यमी, शैक्षणिक संस्था, आर्थिक संस्था एकत्रित काम करत असल्याची बाब अभिमानास्पद आहे.

    तीन दिवसीय परिषदेत सहभागी झालेल्या नव उद्यमी, कॉर्पोरेट संस्था, आर्थिक, शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकार तसेच देशविदेशातील प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. मुंबई फिनटेक हब (महाआयटी) झोन, स्टार्ट अप इंडिया आणि फिन्टिग्रेट झोन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    यावेळी एशिया पॅसेफिक आणि युनायटेड किंगडमचे राज्यमंत्री मार्क क्रिस्टोफर, कॅनडाच्या मुंबई येथील कॉन्सिल जनरल ॲना दुबे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर श्रीनिवास, सिंगापूर फिनटेकचे मुख्यअधिकारी सोपेंदू दुबे यांचीही भाषणे झाली.