Close

    ०७.०१.२०२० भारतास नव्या विचारांची आणि जुन्या आदर्शांची गरज – भगत सिंह कोश्यारी

    Publish Date: January 7, 2020

    मुंबई, दि. 7 : महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये लोकशाही शिस्तीचे वातावरण असणे गरजेचे आहे. स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठांनी याबाबत विचार करुन योजना निर्मितीसाठी आपल्या सुचना कराव्यात. नवीन भारतास नव्या विचारांची आणि जुन्या आदर्शाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    बी. के. बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त) कल्याण आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडवान्स्ड स्टडी, शिमला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया’ : द रोड अहेड या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे सेंचुरी भवन, वरळी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

    राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आपले शैक्षणिक काम हे बुद्धिमत्ता निर्माण करणारे आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, ‘शिक्षण म्हणजे माणसात असलेल्या परीपुर्णतेचे प्रकटीकरण होय’ हा विचार खरेच वास्तवामध्ये साध्य होतोय का, याचा विचार आपण केला पाहिजे. देशाच्या विकासामध्ये चांगल्या मनुष्यबळाची आवश्यकता असून स्वायत्त शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चांगले विचार व चांगला दृष्टीकोन देणारे मनुष्यबळ निर्माण झाले पाहिजे. अशा संस्थांच्या मदतीने सृजनशील विचारांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेत बदल घडविण्यासाठी व ‍विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचे काम केले पाहिजे.

    स्वायत्त महाविद्यालयांच्या माध्यमातून आदर्श संस्कार विद्यार्थ्यांना मिळतील या दृष्टिने प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरुन येणारी पिढी आदर्शवत तयार होईल व देशात आपला आदर्श निर्माण करेल, असा विश्वासही राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केला.

    यावेळी बी.के. बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त) आणि बी.के.बिर्ला पब्लिक स्कूल गव्हर्निग कौन्सिलचे अध्यक्ष ओ. आर. चितलांगे, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ॲडवान्स्ड स्टडी, शिमलाचे संचालक प्रा.मकरंद परांजपे, बी. के. बी. सी. के. चे संचालक डॉ. नरेंद्र चंद्रा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्यासह स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य तसेच प्राध्यापक यावेळी उपस्थित होते

    000