Close

    पदवी घेतलात, आता देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी कार्य करा : राज्यपाल कोश्यारी

    Publish Date: December 27, 2019

    End Date :31.12.2019

    पदवी घेतलात, आता देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी कार्य करा : राज्यपाल कोश्यारी

    विद्यापीठाचा पंधरावा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

    सोलापूर – विद्यार्थ्यांच्या आष्युयात पदवी स्वीकारण्याचा क्षण हा खूप आनंददायी असतो. पदवी घेणे म्हणजे शिक्षणाचा अंत नसून तर यापूढे मोठया जोमाने सार्वजनिक आयुष्यात काम करणे आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या 70 वर्षात भारताने मोठी प्रगती केली आहे. देशाला दिशा मिळाली आहे. आता पुढील पाच वर्षांत देश आर्थिक महासत्ता बनणार आहे. जगावर अधिराज्य गाजविण्यासाठी व देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी युवा विद्यार्थ्यांनी काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

    पुण्यश्लेाक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पंधरावा दीक्षांत समारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्यासह अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी दीक्षांत मिरवणूक पार पडली. यात अग्रभागी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शाह हे ज्ञानदंड घेऊन सहभागी झाले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 11,427 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 6092 विद्यार्थी उपस्थित तर 5335 विद्यार्थ्यांनी अनुपस्थित राहून पदवी ग्रहण केली. तब्बल 80 विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी देवून सन्मानित करण्यात आले तर 54 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देवून गौरविण्यात आले.

    राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, महाविद्यालयाच्या शिक्षणानंतर विद्यापीठात येण्यासाठी भाग्‍य लागते हे भाग्य महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून मला लाभले आहे. पदवी व सुवर्णपदके घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन यापुढे विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग देश हितासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली, बलिदान दिले. स्वातंत्र्यानंतर गेल्या 70 वर्षात भारताने चांगली प्रगती केली आहे. आज देश माहिती व तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सारखे मिसाईल मॅन भारतात जन्मले. विद्यार्थ्यांनी आता विशिष्ठ ध्येय व लक्ष ठेवून नवे भारत निर्माण करण्यासाठी सज्ज राहावे. प्रयत्नामध्ये सातत्य हवे. व्यापकता व विशालता हवी, त्या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले. मराठी भाषेच्या संदर्भात सर्वांनी सन्मान ठेवावा. इतरही भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी विद्यापीठाचा आढावा सादर केला. विद्यापीठाच्या विकासाचा आलेख वाढत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, विद्यापीठाला एक नवी दिशा मिळाली आहे. विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी 90 कौशल्य अभ्यासक्रम सुरु करुन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिसाठी विद्यापीठ प्रयत्न करित आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद, पेटंट, कॉपीराईट्सचे आदी काम विद्यापीठाकडून सुरु आहे. भाषा विभाग सुरु करुन कन्नड, पाली, पाकृत, ऊर्दू व संस्कृत भाषेचे शिक्षण विद्यापीठात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विदेशी विद्यापीठांशी करार करुन शाश्वत विकासावर अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. कृषी पर्यटन, अक्यूप्रेशर, शेअर मार्केट या अभ्यासक्रमांना सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामाध्यमातून समाजाशी जोडलो गेलो आहोत असे डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

    पदवी प्रदान करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. उबाळे, वाणिज्य व व्यवस्थापनाच्या अधिष्ठाता डॉ. कीर्ती पांडे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गोरे, मानवविज्ञानशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांनी स्नातकांना सादर केले. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी स्नातकांना पदवी प्रदान केल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. रेवा कुलकर्णी यांनी केले.