Close

  विद्यार्थ्यानो ! जीवनात एकलव्य बनण्याचा प्रयत्न करा

  Publish Date: December 18, 2019

  End Date:31.12.2019

  विद्यार्थ्यानो ! जीवनात एकलव्य बनण्याचा प्रयत्न करा

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी : अहेरीत एकलव्य मॉडेल स्कुलच्या विद्यार्थ्यांशी संवाद

  गडचिरोली दि.18 विद्यार्थ्यांनो, तुम्ही एकलव्यचे नाव ऐकले आहे का,त्याने केलेल्या त्यागाची माहिती तुम्हाला आहे का, त्याने विद्यार्जनासाठी ज्या कठोर पद्धतीने मेहनत घेतली तशाप्रकारे मेहनत घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे यासाठी एकलव्य बनण्याचा प्रयत्न करा, असे मार्गदर्शनपर उदगार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

  18 डिसेंबर रोजी अहेरी येथिल आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई पॅटर्नच्या एकलव्य मॉडेल निवासी स्कुलमध्ये ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बोलत होते.

  राज्यपालांनी या शाळेला भेट दिल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. यावेळी राज्यपालांनी दिलखुलासपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

  किरण मोचा या विद्यार्थ्याने राज्यपालांना विचारले की तुमच्या जीवनातील अविस्मरणीय आठवणी कोणत्या? यावर राज्यपालांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले,आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय कसा होईल असे काम करण्याचा सल्ला दिला. विपरित परिस्थितीत आपण शिक्षण पूर्ण केल्याचे सांगून ते म्हणाले की,यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.

  तुमचे उत्तराखंड आणि गडचिरोली यात आपणाला काय फरक दिसतो, या वेदिका नावाच्या विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आपण कुठेही गेलो तरी आपला भारत दिसतो.हिमालय असो की गडचिरोली, जिथे भारत माता की जय ऐकायला मिळते तिथे मला आपल्या घरातील लोक दिसतात असे त्यांनी सांगितले.

  यावेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे राज्यपालांनी अवलोकन केले. विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून त्यांना प्रत्येक प्रयोगाबाबतची माहिती दिली.राज्यपालांनी या विद्यार्थ्यांना प्रयोगाबाबत प्रश्न विचारले.त्याची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली.विद्यार्थ्यांचे राज्यपालांनी यावेळी कौतुक केले.

  राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा एसडीओ राहुल गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॉडर्न स्कुलचे प्राचार्य दिनेश चंद्र यांचेसह शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेतले.प्रारंभी विद्यार्थ्यांनी आदिवासी ढेमसा नृत्य सादर केले.