Close

    देशातील महिलांच्या प्रगतीसाठी अहवाल महत्वपूर्ण- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    Publish Date: October 10, 2019

    महाराष्ट्र शासन
    संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर
    दूरध्वनी- 2560652, 2565108, फॅक्स-2565629, E-Mail: dirinfngp@gmail.com

    देशातील महिलांच्या प्रगतीसाठी अहवाल महत्वपूर्ण- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    प्र. प. क्र.725

    दिनांक 10 ऑक्टोबर 2019

    देशातील महिलांच्या प्रगतीसाठी अहवाल महत्वपूर्ण

    – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    राज्यपालांच्या हस्ते ‘भारतीय स्त्रियांची सद्यस्थिती’ अहवालाचे विमोचन

    नागपूर,दि. 10: भारतीय महिलांच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना ‘भारतीय स्त्रियांची सद्यस्थिती’ अहवालाचा नक्कीच फायदा होईल. देशातील स्त्रियांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक स्थिती सुधारण्याकामी मदत होईल. देशातील स्त्रियांची प्रगती होण्यास हा अहवाल अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

    दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात भारतीय स्त्रियांची सद्यस्थिती अहवालाचे विमोचन करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

    यावेळी व्यासपीठावर कुलगुरु सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरु विनायक देशपांडे, नीती आयोगाच्या श्रीमती बिंदू दालमिया, राष्ट्र सेविका समिती प्रमुख संचालिका शांताक्का, दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र प्रकल्पाच्या संचालिका अंजली देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    भारतीय संस्कृतीमध्ये मातृशक्तीला आदराचे स्थान असून, तिने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे भारतीय स्त्रियांचा सर्वांगिण विकास होणे महत्त्वाचे असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले. भारतीय स्त्रियांमध्ये सहनशीलता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तसेच त्या जीवनात समाधानी जास्त लवकर होतात. त्यामुळे त्यांचा आनंदी राहण्याचा निर्देशांक हा उच्च आहे. भारतात पितृसत्ताक पद्धतीमध्ये मातृशक्तीला आदराचे आणि महत्त्वाचे स्थान आहे. सर्व क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने महिला कर्तृत्व सिद्ध करत आहेत. देशाच्या संरक्षण क्षेत्रातही खंबीर नेतृत्व सिद्ध केले असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

    भारतीय मातृशक्तीमध्ये प्रचंड सहनशीलता आहे. महिलांनी उच्चशिक्षित व्हावे. उच्चशिक्षणातून महिलांचा दृष्टीकोन व्यापक होतो. त्यातून त्यांचे जीवनमान उंचावते. ही समाजाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे, हे या अध्ययनातून समोर आले आहे. त्यामुळे देशाच्या विकासप्रक्रियेत महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, आदर्श मातृशक्ती ही देशाचा पाया आहे. भारतीय समाजाला घडवणारी माता ही पहिली शिक्षिका आहे. त्यामुळे देशाला पुन्हा एकदा सुवर्णयुगाकडे नेण्यासाठी मातृशक्तीसोबत सर्वजण प्रयत्न करुयात, असे आवाहनही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

    राष्ट्र सेविका समिती प्रमुख संचालिका शांताक्का यांनी भारतीय स्त्री तिच्या कार्यकर्तृत्वाने तिची कुटुंबात, समाजात, देशात व्याप्ती वाढवते, असे सांगून हा अहवाल देशव्यापी संशोधनातून बनविण्यात आला आहे. भारतीय महिलांची सद्यस्थिती या संशोधनाच्या माध्यमातून तिचे देशाच्या विकासप्रक्रियेतील महत्त्व अधोरेखीत होते. या अध्ययन आणि प्रबोधन टीमने भारतीय महिलांबाबतचे अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन केले असल्याचे शांताक्का यांनी सांगितले.

    यावेळी नीती आयोगाच्या बिंदू दालमिया यांनी भारतीय महिला सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपला ठसा उमटवत असल्याचे सांगून, हे संशोधन महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. अहवालाच्या आधारे देशाच्या विविध विकासयोजनांची अंमलबजावणी करणे सोपे होणार आहे. सध्या नवा भारत साकारला जातोय. देशातील स्त्रियांनी आपले नेतृत्व, मातृत्व आणि कर्तृत्व सिद्ध केले असल्याचे श्रीमती बिंदू दालमिया यांनी सांगितले.

    यावेळी ‘भारतीय स्त्रियांची सद्यस्थिती’ दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र प्रकल्प अहवालाच्या संचालिका अंजली देशपांडे यांनी प्रास्ताविकात भारतीय महिलांची स्थिती जाणून घेण्यासाठी देशभरातील 29 राज्ये, पाच केंद्रशासित प्रदेश आणि 64 टक्के जिल्ह्यांमधील 74 हजार 95 महिलांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये भारतीय महिलांच्या आनंदाच्या पातळीचाही अभ्यास करण्यात आला असल्याचे सांगितले.

    या अहवालासाठी ऑक्सफर्ड हॅपिनेस स्केलच्या दहा निकषांचा वापर केला. सामाजिक सहभाग, भावनिक समाधान, सकारात्मक दृष्टिकोन, शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, स्वाभिमान, मानसिक आरोग्य अशा विविध निकषांवर प्रश्न होते. सर्वेक्षणात सहभागी 35.97 टक्के महिलांनी आयुष्यात प्रचंड आनंदी असल्याचे तर 43.24 टक्के महिलांनी आनंदी असल्याचे उत्तर दिले आहे. त्यातही, आध्यात्मिक क्षेत्राशी संबंध असलेल्या महिला सर्वाधिक आनंदी आहे. याशिवाय, 51 ते 60 वयोगातील महिला सर्वाधिक आनंदी असल्याचे अहवालात सांगितले.

    यावेळी मनीषा कोठेकर, शिल्पा पुराणीक यांचीही समयोचित भाषणे झाली.