Close

    देशाच्या शैक्षणिक परंपरेचा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद

    Publish Date: October 23, 2018

    सिम्बायोसिस विद्यापीठाचा १५ वा पदवीदान समारंभ थाटात संपन्न

    देशाच्या शैक्षणिक परंपरेचा वारसा जोपासत

    विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे

    -राष्ट्रपती रामनाथ कोविंद

    पुणे दि. २३: भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे, तक्षशिला ते नालंदा असा आपल्या देशाला मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौध्दिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले.

    लवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या १५ व्या पदवीदान समारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्यपत्नी सविता कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, लेह-लडाखचे शिक्षणतज्ज्ञ तथा शास्त्रज्ञ डॉ. सोनम वांगचूक उपस्थित होते.

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, शिक्षण घेण्यासाठी जात,‍ लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा “वसुधैव कुटुंबकम”चा वारसा सिंम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, ही गौरवाची बाब आहे. या ठिकाणी शिक्षण घेतलेले परदेशातील विद्यार्थी आपले कायमचे मित्र तर होतीलच, परंतु ते आपले अनौपचारिक राजदूत म्हणून काम करतील, असा विश्वास श्री. कोविंद यांनी व्यक्‍त केला.

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुढे म्हणाले, देशातील अनेक विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना भेट देवून तेथील विद्यार्थ्यांशी संवाद संवाद साधतो, आता गुणवत्तेत मुलांपेक्षा मुलीचे प्रमाण वाढल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. हे आपल्या समाजासाठी आनंदाचे द्योतक असून अभिमानाची बाब आहे. पुणे शहराला मोठी शैक्षणिक परंपरा आहे. १९४८ साली फुले दाम्पत्याने पहिली मुलींची शाळा सुरू करून या परंपरेला सुरुवात केली. त्याच बरोबर न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके या लोकोत्तर पुरुषांचा वारसा या शहराला लाभला आहे. या शहराशी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंध असल्याचे श्री. कोविंद यांनी सांगितले.

    यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शास्त्रज्ञ डॉ. सोनम वांगचूक यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

    यावेळी डॉ. सोनम वांगचूक, कुलगुरु रजनी गुप्ते यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी केले. तर आभार कुलसचिव एम. जी. शेजूल यांनी मानले. यावेळी विद्यापीठाच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.