Close

    जमादार विलास मोरे यांना राज्यपालांनी दिला हृद्य निरोप

    Publish Date: November 9, 2019

    End Date:31.12.2019

    जमादार विलास मोरे यांना राज्यपालांनी दिला हृद्य निरोप

    राजभवन येथे तब्बल ४१ वर्षे सलग सेवा करून निवृत्त झालेले जमादार विलास रामचंद्र मोरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी जल सभागृह येथे खास निरोप समारंभ आयोजित करून हृद्य निरोप दिला.

    विलास मोरे हे प्रामाणिक, कार्यतत्पर व विनम्र स्वभावाचे शिपाई होते. एका मोठ्या कालखंडाचे ते साक्षीदार होते. त्यांनी केलेल्या सेवेचे पुण्य त्त्यांनाच नाही तर त्यांच्या पुढच्या पिढीला मिळेल असे सांगत राज्यपालांनी मोरे यांना सुखी व समाधानी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यपालांच्या हस्ते विलास मोरे तसेच त्यांच्या पत्नीचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

    राजभवन येथे राज्यपालांचे सचिव म्हणून काम केलेले सेवानिवृत्त उपलोकायुक्त जॉनी जोसेफ, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव सतीश त्रिपाठी, निवृत्त उर्जा सचिव सुब्रत रथो, ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी विलास मोरे यांच्या कारकीर्दीचा प्रत्यक्ष भेटून अथवा फोन करून गौरव केला.

    ‘मी साधा मागे उभा राहणारा शिपाई’
    मी साधा राज्यपालांच्या मागे उभा राहणारा शिपाई होतो. राजभवनाच्या ज्या शाही सभागृहात राज्यपाल देशी-विदेशी राष्ट्रप्रमुखांना भेटत असतात, त्या हॉलमध्ये राज्यपालांनी केलेला सन्मान आपण आयुष्यभर विसरणार नाही, या शब्दात विलास मोरे यांनी यावेळी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

    मोरे कधीही उशिराने कार्यालयात आले नाही व कुठल्याही कामाला त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले नाही असे राज्यपालांचे खासगी सचिव उल्हास मुणगेकर यांनी सांगितले.

    विलास मोरे यांनी सन १९७८ साली संदेश वाहक या पदावर रुजू होऊन सादिक अली, ओ पी मेहरा, आय एच लतीफ, डॉ. शंकर दयाल शर्मा, कासू ब्रम्हानंद रेड्डी, सी सुब्रमण्यम, डॉ. पी.सी. अलेक्झांडर, यांसह १४ राज्यपालांची तसेच कार्यवाहू राज्यपालांची सेवा केली असे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी सांगितले. मोरे यांचे सहकारी अर्जुन कालेकर यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.