Close

    आय यु एम एस प्रणालीमध्ये सर्व विद्यापिठांनी सकारात्मक सहभाग घ्यावा -राज्यपाल

    Publish Date: December 12, 2019

    End Date:31.12.2019

    आय यु एम एस प्रणालीमध्ये सर्व विद्यापिठांनी सकारात्मक सहभाग घ्यावा -राज्यपाल

    मुंबई, दि. 12; राज्यभरातील विद्यापिठातील कामांमध्ये सुसुत्रता यावी यासाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली’ (IUMS) मध्ये सहभागी होण्यासाठी सर्व विद्यापिठांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज भवन, मुंबई येथे केले. राज्यातील सर्व विद्यापिठांचा आढावा घेण्यासाठी आयोजित कुलगुरूंच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पी.व्ही. आर श्रीनिवास, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञानचे व्यवस्थापकीय संचालक अजित पाटील, उपस्थित होते.

    राज्यपाल पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे अनेक बाबतीत अग्रेसर असणारे राज्य आहे, विद्यापीठाअंतर्गत येणारे सर्व महाविद्यालये, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकता पुर्ण करण्यासाठी एकात्मिक अशा या प्रणालीचा वापर सुरु करणारे देशातील पहिले राज्य होण्याचा या निमीत्ताने प्रयत्न करावा. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावे. या प्रणालीच्या वापरा संदर्भात काही सूचना असल्यास कळवाव्या. प्रत्येक विद्यापिठाची गरज लक्षात घेऊन प्रणालीमधे त्या अनुषंगाने सुधारणा कराव्यात असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी उपस्थित कुलगुरुंच्या शंकाचे समाधान माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. श्रीनिवास यांनी केले, ते म्हणाले या प्रणालीचा वापर केल्यास आपला डेटा हा दुसरीकडे जाण्याची भीती बाळगू नये. सर्व विद्यापिठांची कार्यपद्धती वेगेवेगेळी आहे, त्यामुळे राज्यभरातील विद्यापिठातील कामांमध्ये सुसुत्रता यावी यासाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली’ वापरण्यास सुरुवात केली तरी प्रत्येक विद्यापिठाची स्वायत्तता कायम राहणार आहे.

    उच्च व तंत्रज्ञान विभागाचे सचिव श्री सौरभ विजय यांनी सांगितले, अशी प्रणाली तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. विद्यापिठांच्या हिताची अशी ही प्रणाली आहे. यात 14 विद्यापिठे, 4600 महाविद्यालये 26 लाख विद्यार्थी आणि 80 हजार शिक्षकांचा समावेश असेल. जानेवारी 2020 पर्यंत प्रशिक्षण देण्यात येईल तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या प्रणालीद्वारे कामकाज सुरु करता येईल.

    राज्यस्तरिय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवात मुंबई विद्यापिठाने सांस्कृतिक नृत्य गायन स्पर्धेसह गोल्डन बॉय आणि गोल्डन गर्ल अशा किताबासह विजेतेपद प्राप्त केल्या बद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांचे राज्यपालांनी विशेष अभिनंदन केले.

    यावेळी विविध विद्यापीठांचे कुलगूरू तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    ***