मुंबई मॅरथॉन २०१९ स्पर्धक नोंदणीचा राज्यपालांनी केला शुभारंभ
दिनांक २० जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरथॉन स्पर्धेसाठी स्पर्धक नावनोंदणीचा प्रारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२७) राजभवन, मुंबई येथे झाला.
क्रीडा व शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार राज पुरोहित, आमदार आशीष शेलार, मुख्य सेवा आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, टाटा समुहाचे हरीश भट, प्रोकॅम इंटरनॅशनलचे विवेक सिंग व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबई मॅरथॉन सुरु झाल्यापासून गेल्या पंधरा वर्षांमध्ये लोकांमध्ये आरोग्य तसेच फिटनेसबद्दल अधिक जागृती निर्माण झाली आहे. मॅरथॉनच्या माध्यमातून भारतीय तसेच विविध देशांमधील पुरुष, महिला, तरुण, वृद्ध तसेच दिव्यांग लोक एका व्यासपीठावर येतात व त्यातून ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचा प्रत्यय येतो, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
मुंबई मॅरथॉनच्या व्यासपीठावरून विविध सामाजिक संस्था निधी संकलन करतात व त्यातून उपेक्षितांच्या कल्याणाचे कार्य होते ही समाधानाची गोष्ट असल्याचे राज्यपालांनी सांगितले.