जवखेडा गावातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची राज्यपाल श्री विद्यासागर राव यांच्याकडून पहाणी
महान्यूज
जवखेडा गावातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची राज्यपाल श्री विद्यासागर राव यांच्याकडून पहाणी
जालना, दि. 17 – भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांना महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी करत समाधान व्यक्त केले.
यावेळी खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय माईनकर, जलसंधारण अधिकारी श्री डोणगावकर, भास्करराव दानवे, आशाताई पांडे, शालीग्राम म्हस्के,घनश्याम गोयल आदींची उपस्थिती होती.
भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामास राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी करत या कामांमध्ये झालेल्या जलसंचयाच्या माहितीबरोबरच याचा शेतकऱ्यांना झालेल्या फायद्याची उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तदनंतर जगनराव मुकूंदराव दानवे यांच्या शेतात करण्यात आलेल्या शेततळयास प्रत्यक्ष भेट देऊन त्याचीही पहाणी राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी केली.
उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधताना राज्यपाल श्री विद्यासागर राव म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आज जालना येथे उपस्थित राहता आले याचा मनस्वी आनंद आहे. हैद्राबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील पाच जिल्हे, कर्नाटकचे तीन जिल्हे व तेलंगणाचे आठ जिल्ह्याचा समावेश होता. मुक्तीसंग्रामामध्ये मराठीपुत्रांचा फार मोठा वाटा होता. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अत्यंत चांगल्या पद्धतीची कामे झाली असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्याचेही राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.