06.05.2026 : VC’s of KBCNM and SRTM Universities calls on Governor
06.05.2026 : राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची आढावा बैठक लोकभवन, मुंबई येथे संपन्न झाली. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन सुधारण्याच्या दृष्टीने विद्यापीठ करीत असलेल्या कार्याचा यावेळी राज्यपालांनी आढावा घेतला. दोन्ही विद्यापीठांनी नामशेष होत चाललेल्या दृश्यकला व लोककला वाचविण्याच्या तसेच त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. यावेळी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी आपापल्या विद्यापीठांचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी 'शाळांशी संपर्क' (स्कुल कनेक्ट), राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, आंतरराष्ट्रीय सहकार्य, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, कौशल्याधारित शिक्षण, विद्यापीठांच्या सर्वोत्तम प्रथा व उपक्रम, संशोधन व नवोन्मेष आदी विषयांची राज्यपालांना माहिती दिली.