Close

    विद्यापीठांमधील उर्दू भाषा विभागाच्या पुनरुज्जीवनासाठी पाठबळ देण्यात येईल – राज्यपाल

    Publish Date: October 26, 2018

    मुंबई, दि. 26 : राज्यातील विद्यापीठांमध्ये उर्दू आणि फारसी भाषा विभागांच्या पुनरुज्जीवनासाठी पाठबळ देण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे दिली.

    महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयमार्फत ‘हमारी धरोहर’ योजनेंतर्गत आयोजित ‘मुशायरा’ कार्यक्रमास राज्यपाल श्री. राव बोलत होते. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, अभिनेते अनू कपूर, लिलीपुट यांच्यासह अनेक नामांकित उर्दू शायर उपस्थित होते.

    मुशायरा कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल श्री. नकवी यांचे अभिनंदन करून राज्यपाल श्री. राव म्हणाले की, इंग्रजी आणि अन्य भाषांमध्येही काव्य वाचनाचे कार्यक्रम होत असतात. मात्र, उर्दू मुशायऱ्यांमधील जिवंतपणा, मजा, विद्वत्ता, सौंदर्याची सर इतर कोणत्याही भाषेतील काव्यात नाही.

    उर्दू भाषा मधूर आणि श्रीमंत बोलींपैकी एक आहे.

    ते पुढे म्हणाले, महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि सार्वजनिक जीवनातील नैतिक मुल्यांचे प्रतिनिधित्व केले. ही मूल्ये शाश्वत आहेत. मुशायरा कार्यक्रम महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासह सामाजिक-सांस्कृतिक सद्भावना आणि बंधुता वाढण्यास मदत करेल. छत्रपती शिवाजी महाराजांनाही फारसी भाषा अवगत होती. आज फारसी आणि उर्दू भाषेतील दुवे कमकुवत होत आहेत. त्यामुळे उर्दू भाषा आणि सर्व प्रादेशिक भाषांचे प्रचार आणि संरक्षण करणे आवश्यक आहे.

    राज्यपाल पुढे म्हणाले, बॉलीवूडवरील उर्दूच्या प्रभावामुळे भारतीय चित्रपट आणि गीते इजिप्त, इंडोनेशिया, खाडी देश, रशिया आणि इतर देशांमध्येही पोहोचू, मान्यता मिळवू शकले. उर्दू शायरांनी भारतीय सिनेमा आणि उर्दू कविता लोकप्रिय करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

    मुशायऱ्याचा अनेक शतकांचा खूप जुना आणि मनोरंजक इतिहास आहे. हे स्व-अभिव्यक्तीचे आणि निरोगी साहित्यिक मनोरंजनाचे एक सशक्त साधन आहे. यामध्ये विनोद, दुःख, देशभक्तीची भावना आहे तसेच अध्यात्मही आहे. मुशायरा हा समाजातील विरोधाभास, जटिलता, ढोंगीपणा याच्या दर्शनाचा आरसा आहे. मुशायरा लोकशाहीची भावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भावना कायम राखते.

    युवक आणि महिला कवींनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून मुशायऱ्याला नवा आयाम देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जगातील मुशायरा प्रेमींपर्यंत मुशायरा पोहोचविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. मुंबईसारख्या शहरात दरवर्षी जगातील शायर आणि गीतकारांना आयोजित करून जागतिक स्तरावरील मुशायरा कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असेही श्री. राव यावेळी म्हणाले.

    श्री. नक्वी म्हणाले, उर्दू कायमच मानवी मूल्यांना शक्ती प्रदान करत आली आहे. जगातील लोकांना जोडण्याचे, समाजात एकता, सौहार्द निर्माण करण्याचे काम उर्दू करते. आपल्या देशाला नामांकित शायर, कवींची परंपरा आणि वारसा आहे. हा वारसा समोर आणण्यासाठी तसेच महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांचे विचारांचा प्रसार करण्यासाठी हा मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

    कार्यक्रमात शायर मन्सूर उस्मानी, वसीम बरेलवी, हसीब सौफ, मंजर भोपाली, शकील आझमी, कैसर खालिद, डॉ. व्ही. पी. सिंग, श्रीमती शबिना अली, डॉ. नसीन निखत, निखत अमरोही, चित्रपट अभिनेत्री सलमा आगा आदींनी बहारदार शायरी, गझला सादर केल्या.