राज्यपालांच्या हस्ते ‘गुलबुटे’ मासिकाचे प्रकाशन
राज्यपालांच्या हस्ते ‘गुलबुटे’ मासिकाचे प्रकाशन
लहान मुले मातृभाषेपासून दुरावत असल्याबद्दल राज्यपालांनी व्यक्त केली चिंता
इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुले हळू हळू मातृभाषेपासून दुरावत चालली आहेत. बालसाहित्य अधिकांश इंग्रजी भाषेतून निर्माण होत आहे. पुढील २० ते ३० वर्षानंतर मुलांना मातृभाषेतून लिहिता आणि वाचता येऊ शकेल की नाही, अशी चिंताजनक परिस्थिती दिसत आहे. या गोष्टीचा गांभीर्याने विचार व्हावा तसेच भारतीय भाषांमधून अधिक बालसाहित्य निर्माण करावे असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
उर्दू भाषेतून प्रकाशित होत असलेल्या ‘गुलबुटे’ या लहान मुलांच्या मासिकाच्या पहिल्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे बुधवारी (दिनांक १९) करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
चोवीस तास उपलब्ध असलेले लहान मुलांचे दूरचित्रवाणी चानेल्स, इंटरनेट, समाज माध्यमे आणि मोबाईल गेम्समुळे लहान मुले साहित्य वाचनापासून दूर जात आहेत तसेच त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभुमीवर मुलांना चांगल्या साहित्याची गोडी लावण्यासाठी पालक व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे असे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.
शाळांनी आपली वाचनालये पुस्तकांनी सुसज्ज करावी तसेच शिक्षकांनी डिजिटल माध्यमातून गोष्टी सांगून मुलांना साहित्याची गोडी लावावी, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. चांगले साहित्य नैतिक मुल्यांची वृद्धी करते, तसेच एकता आणि अखंडतेची भावना वाढविते. यास्तव चांगल्या साहित्याला प्रोत्साहन दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
‘गुलबुटे’ मासिकाच्या प्रकाशन सोहळ्याला आमदार अमीन पटेल. माजी आमदार सुहेल लोखंडवाला, माजी आमदार युसुफ अब्राहनी, अंजुमन–ई-इस्लामचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, मासिकाचे संपादक फारुख सय्यद, तसेचे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.