05.08.2026: राज्यपालांनी भारताच्या पहिल्या राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांचा सत्कार केला
05.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह भारताच्या पहिल्या राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांचा लोकभवन येथे भव्य सत्कार केला. दृष्टिबाधित महिला टी-२० विश्वचषक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या संघाच्या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘देख ले! इंडिया’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर ऋतु तावडे, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू तसेच विविध शाळा व महाविद्यालयांतील दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.