Close

  सुव्यवस्थित प्रशासनासाठी विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पध्दती निर्माण करावी . राज्यपाल चे. विदयासागर राव

  Publish Date: October 16, 2018

  महान्यूज

  सुव्यवस्थित प्रशासनासाठी विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पध्दती निर्माण करावी

  -राज्यपाल चे. विदयासागर राव

  * विदयापीठ व महाविदयालयांनी शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हाने स्वीकारावीत

  * शिक्षण,संशोधन व एकूण उत्कृष्टतेसाठी गुंतवणूक करावी

  लातूर दि 16:-विदयापीठ व महाविदयालयांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हाने स्वीकारुन शिक्षण पध्दती बदलण्याची वाट न पाहता ती बदलण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. शिक्षणातील शॉर्टकटची संस्कृती नाकारुन शिक्षण, संशोधन व एकूणच उत्कृष्ट्रतेसाठी गुंतवणूक करावी. आणि त्याकरिता इतर विद्यापीठ व महाविद्यालये तसेच परदेशातील विद्यापीठांशी शैक्षणिक संलग्नता करुन सुव्यवस्थित प्रशासनासाठी विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पध्दती निर्माण करण्याचे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

  स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, लायन्स क्लब लातूर व शिवछत्रपती शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित “उच्च शिक्षणातील नवीन आयाम ” या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय सेमिनारच्या उद्घाटनाप्रसंगी राज्यपाल श्री. राव बोलत होते.

  यावेळी राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, खासदार सुनील गायकवाड, माजी खासदार गोपाळराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलिंद म्हैसेकर, प्राचार्य अनिरुध्द जाधव, प्राचार्य महादेव गव्हाणे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.

  राज्यपाल श्री.राव पुढे म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात मोठा तरुण लोकसंख्येचा देश असून 2020 पर्यंत अमेरिका व चीन पेक्षाही भारत किमान आठ वर्षानी तरुण देश आहे. परंतु या तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि कौशल्य देण्याचे मोठे आवाहन आपल्या शिक्षण पध्दती समोर आहे, असे त्यांनी म्हटले.

  देशाची अर्थव्यवसथा व विकास वृध्दीगंत होण्यासाठी उत्कृष्ट मनुष्यबळाचा पुरवठा शिक्षण पध्दतीतून होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याबरोबरच शिक्षण पध्दतीतून योग्य पध्दतीने विद्यार्थ्यांना पारिस्थितीक तंत्र , संशोधक आणि विद्यार्थांचे ध्येय, स्वप्न व महत्वाकांक्षा पूर्ण करणारा शिक्षक मिळणे अत्यंत महत्वाचे असल्याचे राज्यपाल श्री.राव यांनी सांगितले.

  भारताला उच्च शिक्षणाचा मोठा इतिहास आहे. या शिक्षण पध्दतीने शास्त्रज्ञ व विद्वानांची निर्मिती केली असून प्राचीन काळातील नालंदा, तक्ष्यशीला व विक्रमशीला विद्यापीठांची माहिती राज्यपाल श्री. राव यांनी सांगून या विद्यापीठांनी प्राचीन काळी जागतिक शिक्षणाचा मोठा भाग व्यापलेला होता, असे सांगितले त्याप्रमाणेच गणितज्ज्ञ भास्कराचार्य , अणूची संरचना करणारे आचार्य कणाद व चरक संहितेची निर्मिती करणाऱ्या चरक या प्राचीन विद्वानांची माहिती त्यांनी दिली.

  इंग्रजांनी भारतात उच्च शिक्षण पध्दतीची सुरुवात केली ती नागरी सेवक, क्लार्क आणि कनिष्ठ स्तरावरील प्रशासकीय काम पाहणारे निर्माण करण्यासाठीच परंतु या पध्दतीतून विचारवंत आणि विदवान निर्माण होणार नव्हते, असे सांगून राज्यपाल राव म्हणाले की, त्यानंतर नवीन भारत नवीन ध्येय घेऊन उदयाला येत होता.त्याला नव्या शिक्षण पध्दतीची गरज होती, ती निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे, त्या दृष्टीने काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

  उच्च शिक्षणाच्या पध्दतीत दुरुस्ती होणे गरजेचे असून त्याकरिता एखादया संस्थेने पुर्नबांधणीची प्रक्रिया दर्जा आणि उत्कृष्टतेचा दृष्टीकोन ठेवून राबविली पाहिजे व हे घडण्यासाठी नियोजनकर्ते, व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेच्या प्रती आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे श्री. राव यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थापकांनी रिक्त्‍ जागा भराव्यात तसेच अनेक शैक्षणिक संस्था नॅकचे मूल्यांकन गांभीर्याने घेत नाहीत, त्यात बदल झाला पाहिजे व या मूल्यांकन पध्दतीत बसण्यासाठी कोणत्याही शॉर्टकटचा वापर करु नये, असे आवाहन त्यांनी केले.

  अनेक विद्यापीठामधील पदवीदान समारंभ प्रसंगी प्रत्येक दहा सूवर्णपदकातून आठ सूवर्णपदक विजेत्यांमध्ये मुलीच असतात. परंतु त्या मुली नंतर प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात कोठेच दिसत नाहीत. अमेरिका येथील एका सर्वेक्षण संस्थेने जगातील 91 देशातील 22 हजार खाजगी कंपन्यांचे सर्वेक्षण केले. त्यातील 30 टक्के पेक्षा अधिक कंपन्यामध्ये महिला कार्यकारी पदावर होत्या व त्यांच्या कंपन्यांचा लाभही अधिक होता असे सांगून राज्यपाल श्री. राव यांनी महिलांना आर्थिक जाणही अधिक असते व त्यासाठी उच्च शिक्षण महत्वाचे असल्याचे असून अशा उच्च शिक्षण महिलांना संधी उपलब्ध्‍ करुन देऊन त्यांच्या ज्ञानाचा राष्ट्रउभारणीत सहभाग घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

  लातूर जिल्हयाने शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती करुन शिक्षणात लातूर पॅटर्न यशस्वीपणे राबविला असल्याचे सांगून या पॅटर्नमध्ये राजर्षि शाहू कॉलेज व डॉ. गोपाळराव पाटील यांचे येागदान मोठे असल्याचे सांगून राज्यपाल श्री. राव यांनी डॉ. पाटील यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

  उच्च शिक्षणात जागतिक स्तरावरील नवीन विषयांची खोलवर माहिती घेऊन त्या विषयांचा संपूर्ण प्राणी जीवनाच्या हितासाठी वापर केला पाहिजे तसेच उच्च शिक्षणासाठी पुढील काळात उपग्रहांचा वापर करण्याचे आवाहन श्री. चाकूरकर यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना केले.

  लातूर जिल्हा हा राज्याचा शैक्षणिक हब करण्याबरोबरच इनोव्हेशन हबही करण्यात येईल. याकरिता उच्च शिक्षणातील नवीन परिमाणांचा वापर केला जाईल, असे पालकमंत्री निलंगेकर यांनी सांगितले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. म्हैसेकर, खासदार डॉ. गायकवाड, माजी खासदार गोपाळराव पाटील यांचीही भाषणे झाली.

  प्रारंभी राज्यपाल व मान्यवरांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर राज्यपाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन या एकदिवशीय राष्ट्रीय शैक्षणिक सेमिनारचे उद्घाटन झाले. त्यानंतर या सेमिनारच्या निमित्ताने स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजर्षि शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केले. यावेळी त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अनुजा जाधव यांनी केले तर आभार प्रा. शिवशंकर पटवारी यांनी मानले.