बंद

    31.01.2020 :- साहित्य आणि कलेमध्ये समाजाला घडविण्याची ताकद – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: January 31, 2020

    साहित्य आणि कलेमध्ये समाजाला घडविण्याची ताकद – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
    ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’चे उद्घाटन

    पुणे : साहित्य आणि कला हे समाजाचे प्रतिबिंब दाखविणारा आरसा असून समाजाला घडविण्याची ताकद यामध्ये असते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

    येथील बालगंधर्व रंगमंदिर मध्ये ‘डेक्कन लिटरेचर फाऊंडेशन’ तर्फे पुण्यात आयोजित तीन दिवसीय ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’चे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पोलीस आयुक्त डॉ.सत्यपाल सिंह, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साखर आयुक्त सौरभ राव, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, उप जिल्हाधिकारी मोनिका सिंग, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोनिका सिंग यांच्या गझलांच्या संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.

    राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक राजधानी असून हे कलेचं केंद्र आहे. साहित्य प्रेमींच्या शहरात होणारा हा महोत्सव महत्त्वपूर्ण आहे. समाजाचे प्रतिबिंब दाखविणारा साहित्य हा आरसा असतो. समाजाला दिशा दाखवून समाज घडविण्याची ताकद कलेत असते. साहित्य, चित्र, मालिका व चित्रपटांचा प्रभाव समाजावर पडत असतो. समाज युगानुयुगे टिकवण्यासाठी साहित्यिक, कलाकार योगदान देऊ शकतात समाजाला एकत्र आणण्यासाठी योगदान देणाऱ्या साहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. या तीन दिवसीय महोत्सवाच्या विचारमंथनातून नवी दिशा द्यावी, अशी अपेक्षा श्री.कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

    विशाल भारद्वाज म्हणाले, साहित्य, संस्कृती, कला यांचा चांगला मिलाफ या फेस्टिव्हलमध्ये होत आहे. या निमित्ताने होणारे विचारमंथन समाजाला नवा विचार देईल.

    सत्यपाल सिंह म्हणाले, नव्या पिढीसमोर चांगले साहित्य येणे आवश्यक आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी, समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी साहित्याची गरज आहे. सर्वांना जोडण्याचे काम साहित्याने करावे.

    मोनिका सिंग यांनी प्रास्ताविक केले. राजीव श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य,कविता, नाट्य, चर्चा अशा बहुरंगी कार्यक्रमांचे आयोजन या फेस्टीव्हलमध्ये करण्यात आले आहे.