बंद

  30.09.2021: युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन द्वारे करोना योद्ध्यांचा सत्कार

  प्रकाशित तारीख: September 30, 2021

  युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन द्वारे करोना योद्ध्यांचा सत्कार

  राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत लोकसेवा गौरव पुरस्कार प्रदान

  आ. गणपत गायकवाड, उपमहापौर भगवान भालेराव, जगदीश गायकवाड, सीमाताई आठवले, झरीन खान सन्मानित

  भारताने जगाला भगवान बुद्धांचा दया, शांती व करुणेचा संदेश दिला. बुद्ध धर्माचा पुढे चीन, जपान, श्रीलंका आदी अनेक देशात प्रचार प्रसार झाला. भारत ही भगवान बुद्धांची भूमी असल्याने भारताने सर्व धर्मियांचे येथे स्वागत केले. भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कठीण परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन आपले जीवन लोक कल्याणासाठी व्यतीत केले. भगवान बुद्ध व डॉ आंबेडकरांचे आदर्श पुढे ठेवून समाजाने एकदिलाने कार्य केले तर करोना सारखे कोणतेही संकट आले तरीही ते पराभूत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनेच्या वतीने गुरुवारी (दि. ३०) राजभवन येथे लोकसेवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय समाजकल्याण व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप उपस्थित होते.

  करोना महामारी कधी संपूर्णपणे जाईल हे सांगणे कठीण आहे असे सांगून करोनाला हरवून लोकांना जगवायचे ध्येय ठेवून कार्य केले पाहिजे असे उद्गार रामदास आठवले यांनी काढले. यावेळी त्यांनी काव्याच्या माध्यमातून करोना योद्ध्यांचे अभिनंदन केले.

  राज्यपालांच्या हस्ते यावेळी आमदार गणपत गायकवाड, उल्हासनगरचे उपमहापौर भगवान भालेराव, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई रामदास आठवले, इंग्लंड येथील हरबन्स विर्डी, अभिनेत्री डॉ झरीन खान, यांचेसह ३५ करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप जगताप संपादित दैनिक लोकधारा टाइम्सच्या करोना विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.