बंद

    30.01.2023: राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

    प्रकाशित तारीख: January 30, 2023

    राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

    मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत.

    विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठीत करण्यात आली आहे, तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे.

    आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेश कुमार (युजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.

    तर, आयआयटी कानपुरचे संचालक डॉ अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिर‍िक्त मुख्य सचिव दिपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ मीना चंदावरकर (युजीसी प्रतिनिधी) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.

    मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ दिनांक १० सप्टेंबर २०२2 रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिंगबर शिर्के यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपव‍िण्यात आला आहे.

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांचा कार्यकाळ दिनांक १८ मे २०२२ रोजी संपल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ कारभारी काळे यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.