बंद

    28.10.2020 : राज्यपालांच्या हस्ते छायाचित्रकारांना पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: October 28, 2020

    राज्यपालांच्या हस्ते छायाचित्रकारांना पुरस्कार प्रदान

    फोटोग्राफीक ॲण्ड आर्टिस्टस सोशल फाऊंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांचा आज राजभवन येथे सन्मान करण्यात आला.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते टाइम्स ऑफ इंडियाचे छायाचित्रकार संजय हडकर यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    एशियन ऐज / डेक्कन क्रोनिकलचे छायाचित्रकार राजेश जाधव यांना द्वितीय पुरस्कार तसेच कोल्हापूर येथील छायाचित्रकार अश्पाक किल्लेदार यांना तृतीय परितोषिक प्रदान करण्यात आले.

    पीटीआय व हिंदुस्तान टाइम्स मिडियासाठी काम करणारे छायाचित्रकार भुषण कोयंडे, नाशिक येथील लोकमतचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे तसेच कोल्हापूर येथील छायाचित्रकार शरद पाटील यांना राज्यपालांच्या हस्ते उत्तेजनार्थ परितोषिके प्रदान करण्यात आली.

    ‘छायाचित्रण ही देखील राष्ट्रसेवा’

    पुरस्कार विजेत्या छायाचित्रकारांचे अभिनंदन करताना राज्यपाल म्हणाले की, छायाचित्रकारांना अनेकदा आव्हानात्मक कठीण परिस्थितीमध्ये काम करावे लागते, प्रसंगी त्यांना लाठ्या काठ्या खाव्या लागतात. आपल्या छायाचित्रणाच्या माध्यमातून ते जनतेच्या समस्या समोर आणतात. ही देखील एक प्रकारची राष्ट्रसेवाच आहे, असे त्यांनी सांगितले.

    ‘पाऊस’ या मुख्य विषयावर यंदाची छायाचित्रण स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये देशभरातून २१३ स्पर्धकांनी भग घेतला व त्यातून सर्वोत्तम छायाचित्रांसाठी तीन पारितोषिके व ३ उत्तेजनार्थ पारितोषिके निवडण्यात आल्याची माहिती फोटोग्राफीक ॲण्ड आर्टीस्टस सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष समाधान पारकर यांनी यावेळी दिली. संस्थेचे विश्वस्त दीपक खाडे, संदीप आजगावकर व बाबु पवार हे देखील यावेळी उपस्थित होते.