बंद

    26.11.2021: सैन्य दलातील करोना योद्धे साक्षात देवदूत: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: November 27, 2021

    संविधान दिन व दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    वीर सेनानी फाउंडेशनच्या वतीने सैन्यदलातील वैद्यकीय रत्न सन्मानित

    पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा विशेष सत्कार

    सैन्य दलातील करोना योद्धे साक्षात देवदूत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    सीमेवर रात्रंदिवस पहारा देऊन देश रक्षणाचे कार्य करणाऱ्या सैन्यदलातील अधिकारी व जवानांनी करोना काळात सैन्य दलाच्या विविध रुग्णालयांमधून अद्भुत आरोग्यसेवा प्रदान करत हजारो लोकांना जीवनदान दिले. विविध देशांमधून प्राप्त झालेले ऑक्सिजन सिलेंडर्स व औषधे पोहोचविणारे सैन्य दलातील करोना योद्धे साक्षात देवदूत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    वीर सेनानी फाउंडेशन या वीर नारी व वीर माता-पित्यांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे सैन्यदलातील करोना योद्ध्यांच्या सत्काराचे शुक्रवारी (दि. २५) राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. संविधान दिन व दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, वीर सेनानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कर्नल विक्रम पत्की, मानद सचिव स्वराधीश डॉ भरत बलवल्ली, आश्रयदाते मधुभाई शहा तसेच सैन्यदलाच्या विविध वैद्याकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते करोना काळातील उल्लेखनीय सेवेबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

    करोनाशी युद्ध करताना देशाने सन १९६५ व १९७१ सालच्या युद्धाच्या वेळी पाहिलेली एकता अनुभवली. अमेरिकेसारख्या विकसित देशांनी भारताकडून औषधाची मागणी केली तसेच भारताने अनेक लहान-मोठ्या देशांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली, असे सांगताना करोना विरुद्ध लढ्यात निरंतर जागरूकता व करोना विरुद्ध नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.

    यावेळी आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस पुणे येथील लेफ्टनंट कर्नल टेंटू अजय कुमार, सुभेदार सतीश खिलारी, नाईक जितेंद्र महादेव आघव व नाईक एसके यादव, अश्विनी हॉस्पिटल येथील लेफ्टनंट कर्नल अशोक मेश्राम, सर्जन कमांडर रमाकांत, नर्सिंग ऑफिसर कर्नल विजयालक्ष्मी, कमांड हॉस्पिटल पुणे येथील कॅप्टन अक्षता, नाईक एन एम सिंग, नाईक हाऊसकिपर एस. बंगारू राजू व वॉर्ड सहायिका सोनाली सोमनाथ राऊत, एनडीए मिलिटरी हॉस्पिटल खडकवासला येथील मेजर प्रीती मिश्रा, नायब सुभेदार पी के साहनी, नाईक मुन्ना कुमार व स्टेशन आरोग्य संघटना आर्मी येथील माजी नायब सुभेदार सुनील कुमार यांचा राज्यपालांच्या हस्ते शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

    पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, नवनीत आरोग्य केंद्राचे प्रवीण कर्मण गाला व प्रभाबेन गाला तसेच मास्टर क्लीन सोल्युशन्स सर्व्हिसेस संस्थेच्या प्राची वैभव अरुडे व वैभव शिवाजी अरुडे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    यावेळी गायक संगीतकार भरत बलवल्ली यांनी राज्यपालांना ‘रागोपनिषद’ ग्रंथ भेट दिला. राज्यपालांनी ग्रंथाची तसेच बळवल्ली यांच्या कार्याची प्रशंसा केली.

    *****