बंद

  24.03.2022: गुणवत्ता राखल्यास आयडॉलमधून एकलव्याप्रमाणे निष्णात विद्यार्थी घडतील : राज्यपाल

  प्रकाशित तारीख: March 24, 2022

  गुणवत्ता राखल्यास आयडॉलमधून एकलव्याप्रमाणे निष्णात विद्यार्थी घडतील : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासाठी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी दूरस्थ शिक्षणाची आज अधिक आवश्यकता आहे असे सांगताना विद्यापीठाने आपल्या दूरस्थ व मुक्त शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत केल्यास ‘आयडॉल’मधून एकलव्याप्रमाणे अनेक निष्णात विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. ‘आयडॉल’ या संस्थेने दूर व मुक्त शिक्षण क्षेत्रातील आदर्श संस्था होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

  मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त फिरोजशाह मेहता भवन विद्यानगरी मुंबई येथे गुरुवारी (दि. २४) आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्रकुलगुरु रवींद्र कुलकर्णी, आयडॉलचे संचालक प्रकाश महानवर, उपसंचालक मधुरा कुलकर्णी, निमंत्रक मंदार भानुशे, विभागप्रमुख व विद्यापीठाच्या प्राधिकार मंडळांचे सदस्य उपस्थित होते.

  पत्रव्यवहार अभ्यासक्रमापासून तर आजच्या दूर व मुक्त शिक्षण पद्धतीपर्यंत अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत विलक्षण मोठे बदल झाले आहेत असे सांगून कोविड संसर्गाच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे महाविद्यालयांपासून दूर राहून देखील शिक्षण ठेवता येते असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला, असे राज्यपालांनी सांगितले. कोविड संसर्ग काळ आव्हान होते तशीच ती ऑनलाईन शिक्षणासाठी सुसंधी देखील होती असे मत राज्यपालांनी व्यक्त केले.

  दूरस्थ अभ्याक्रमाचा अभिनेते, व्यावसायिक व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभ होऊ शकतो व त्यातून सकल नोंदणी वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट देखील सफल होऊ शकते असे राज्यपालांनी सांगितले.

  परीक्षेची संकल्पना बदलणार : सुहास पेडणेकर
  कोविड संसर्ग कमी झाल्यामुळे आगामी काळात ऑनलाईन व ऑफलाईन अश्या संमिश्र शिक्षणाला महत्व असेल असे सांगताना अध्यापनात नावीन्य व तंत्रज्ञान यांची भूमिका महत्वाची असेल असे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सांगितले. आगामी काळात परीक्षांची संकल्पना बदलून विद्यार्थ्यांचे निरंतर मूल्यमापन करण्यावर भर असेल असे त्यांनी सांगितले. दूरस्थ शिक्षण संस्था आगामी काळात स्वायत्त संस्था म्हणून काम करेल असे त्यांनी सांगितले.
  आयडॉलच्या माध्यमातून १३ नवे अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित असल्याचे नमूद करून आयडॉल ही शिक्षणाचा विस्तार करताना शिक्षण परवडणारे राहील तसेच ते गुणवत्तापूर्ण राहील याची खातरजमा करेल असे प्रकुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

  दूर व मुक्त शिक्षण विभागाची सुरुवात १९७१ साली ८४५ विद्यार्थ्यांपासून होऊन आज ८०,००० विद्यार्थी त्यामाध्यमातून शिक्षण घेत असल्याचे आयडॉलचे संचालक प्रकाश महानवर यांनी सांगितले. दूर व मुक्त शिक्षण परवडणारे व समन्यायी असून पुढील वर्षी विद्यार्थ्यांची संख्या एक लाखावर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.