बंद

    24.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

    प्रकाशित तारीख: January 25, 2025
    राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

    उत्कृष्ट सांस्कृतिक प्रस्तुतीकरिता राज्यपालांकडून मुंबई विद्यापीठाला बक्षीस; दोन महाविद्यालयांना देखील बक्षीस जाहीर

    राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

    उत्तर प्रदेशची भूमी संपूर्ण देशाकरिता वंदनीय : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    उत्तर प्रदेश राज्याचा तसेच दमण, दीव, दादरा – नगर हवेली केंद्र शासित प्रदेश येथील लोकजीवन व संस्कृतीचे राग, ताल व नृत्याच्या माध्यमातून जिवंत दर्शन घडविल्याबद्दल राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठाला २५००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. यावेळी सांस्कृतिक सादरीकरणात सहभागी तळासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय व वाडा येथील डॉ शांतीलाल धनजी देवशी महाविद्यालय यांना देखील राज्यपालांनी प्रत्येकी २५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

    एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २४) उत्तर प्रदेश राज्याचा तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपालांनी सदर बक्षीस जाहीर केले.

    उत्तर प्रदेश भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. उत्तर प्रदेश ही अयोध्येमुळे प्रभू रामाची, मथुरेमुळे भगवान कृष्णाची तर काशीमुळे भगवान शिवाची भूमी असल्याचे सांगून गंगेच्या किनारी वेदांचा उगम झाला असल्याची मान्यता असल्यामुळे उत्तर प्रदेशची भूमी संपूर्ण देशाकरिता वंदनीय आहे असे राज्यपालांनी सांगितले. उत्तर प्रदेशाचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय विकासात अविस्मरणीय योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

    उत्तर प्रदेश तसेच दमण दीव दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील अनेक लोक आज महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक व औद्योगिक विकासात योगदान देत असल्याबद्दल राज्यपालांनी प्रशंसोद्गार काढले.

    देश प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरे करीत असताना उत्तर प्रदेश आपला ७५ वा राज्यस्थापना दिवस साजरा करीत आहे तसेच ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत होण्याला देखल ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

    महाराष्ट्राचे सुपुत्र भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला उत्कृष्ट राज्यघटना लाभली व त्यामुळे इतर देशांचे विभागाज झाले तरीही भारत एकसंध राहिला असे राज्यपालांनी सांगितले.

    ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे लोकांचा इतर राज्यांप्रती व तेथील सांस्कृतिक मूल्यांप्रती आदर वाढत आहे. संबंधित राज्यांची भाषा, लोककला, जीवनशैली यांचा सर्वांना परिचय होत असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केंद्र शासित प्रदेशांचे तारपा नृत्य, उत्तर प्रदेशचे राज्यगीत, चारकुला नृत्य, भक्तीगीत व कव्वाली सादर केले. तेजल चौधरी या विद्यार्थिनीने कथक व ठुमरी सादर केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालक केल्याबद्दल राज्यपालांनी ऋषभ उपाध्याय विद्यार्थ्याला कौतुकाची थाप दिली तसेच रांगोळी कलाकार विलास राहाटे याला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

    राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी प्रास्ताविक केले तर अवर सचिव विकास कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

    कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु अजय भामरे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ सुनील पाटील, संस्कृत संयोजक निलेश सावे, विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.