बंद

  21.11.2021: राज्यपालांच्या हस्ते मुंबई हलचल अचिव्हर्स पुरस्कार प्रदान

  प्रकाशित तारीख: November 21, 2021

  विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ५० करोना योद्धे सन्मानित

  राज्यपालांच्या हस्ते मुंबई हलचल अचिव्हर्स पुरस्कार प्रदान

  दैनिक मुंबई हलचल तसेच पत्रकार संघ कल्याण एसोसिएशनच्या वतीने देण्यात येणारे दैनिक ‘मुंबई हलचल अचिव्हर्स पुरस्कार’ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २१) राजभवन येथे प्रदान करण्यात आले.

  हाजी आली दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सुहेल खंडवाणी व दैनिक मुंबई हलचलचे मुख्य संपादक दिलशाद खान यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

  न्यूज व्हायरस मिडिया ग्रुप उत्तराखंडचे मुख्याधिकारी मोहम्मद सलीम सैफी, जयभारत टीव्ही उत्तराखंडचे संपादक नितीन गुप्ता, चित्रपट निर्माते दिग्दर्शक सौरभ तिवारी, संगीतकार राज आशु, समाजसेवी चित्रपट निर्माते किरण कुमार तितोरीया, न्यूज इंडियाचे सीईओ संपादक सरफराज सैफी, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद, उद्योजक मोहम्मद फारुख घीवाला, राकेश दुबे, पत्रकार अभिमन्यू शितोळे, नझारा टेक्नोलॉजीचे प्रमुख विकाश मित्तरसेन, ठाणे पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे, बबिता ओभान, कमल पालन, यांसह ५० जणांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

  ‘देशकार्यासाठी अधिक योगदान द्यावे’ : राज्यपाल

  भारतात धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत. दुखी व कष्टी लोकांना मदत करणे याला लोक आपले धार्मिक कर्तव्य मानतात. दुसऱ्यांचे हित पाहणे यासारखा दुसरा धर्म नाही अशी शिकवण संत तुलसीदास यांनी देखील दिली आहे. करोना काळात सर्वांनी स्वतःसोबतच इतरांचे हित पाहिले व निःस्वार्थपणे लोकांची सेवा केली. त्यामुळेच भारतातील मृत्यूदर अनेक विकसित देशांपेक्षा कमी राहिला. देशाला सशक्त व समृद्ध बनवून पुढे न्यायचे असेल तर करोना विषयक सावधगिरी बाळगून देश कार्यासाठी अधिक योगदान द्यावे लागेल असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

  **