बंद

    20.11.2021: राज्यपालांच्या हस्ते नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: November 20, 2021

    राज्यपालांच्या हस्ते नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार प्रदान

    मुख्य सचिव सीताराम कुंटे, मनीषा म्हैसकर, राधेश्याम मोपलवार सन्मानित

    नवराष्ट्रच्या ‘रामराज्य’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

    प्रशासन, पोलीस व वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे भारताची करोनावर यशस्वी मात : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    पाश्चात्य देशात करोनामुळे मृत्यूचे थैमान सुरु असताना प्रशासन, पोलीस व वैद्यकीय क्षेत्रातील अद्भुत कामगिरीमुळे भारताने करोनावर यशस्वीरित्या मात केली. करोना संसर्ग काळात वॉर्ड बॉय पासून वैद्यकीय संचालकांपर्यंत, पोलिस शिपायापासून महासंचालकांपर्यंत, फेरीवाल्यापासून उद्योजकांपर्यंत तसेच समाजसेवकांनी तनमनधनाने योगदान दिले. मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दिशादर्शन केल्यामुळेच हे कार्य साध्य झाले, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच करोना संसर्ग काळात आघाडीवर राहून नेतृत्व प्रदान करणाऱ्या ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २०) ‘नवभारत गव्हर्नन्स’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नवराष्ट्र दैनिकातर्फे प्रकाशित ‘रामराज्य’ या दिवाळी विशेषांकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

    राज्यपालांच्या हस्ते मुख्य सचिव सीताराम कुंटे, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, रस्ते विकास महामंडळाचे राधेश्याम मोपलवार, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, पालिकेचे अपर आयुक्त सुरेश काकाणी यांसह विविध क्षेत्रातील प्रशासकीय प्रमुखांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    भारतावर अनेक वर्षे परकीय सत्ता असताना येथील श्रेष्ठ अश्या भारतीय संस्कृतीने देशाला वाचविले. राम हे चैतन्य तत्व असून सर्वांनी या चैतन्याप्रती जागरूक झाल्यास अतिप्राचीन अश्या भारताला आपण पुनश्च श्रेष्ठ राष्ट्र बनवू शकू असे सांगताना राज्यपालांनी नवराष्ट्रच्या ‘रामराज्य’ विशेषांकाचे कौतुक केले.

    पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक नवभारत समूहाचे महाव्यवस्थापक निमिष माहेश्वरी यांनी केले तर नवभारत समूहाचे अध्यक्ष विवेक प्रसाद यांनी आभार प्रदर्शन केले.