बंद

    19.01.2021 : आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

    प्रकाशित तारीख: January 19, 2021

    आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

    पुणे, दि. १९ : आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

    प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा.सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव तसेच शिक्षण व अन्य विभागातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सेंट्रल सॉफीस्टीकेटेड ऍनालेटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबीनचे डिजिटल स्वरुपात अनावरण व सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रा.डॉ. गजानन एकबोटे व प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले,

    आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. सदाचार ही जीवनातील महत्वपूर्ण बाब आहे. सदाचारी व्यक्तीचा सदैव गौरव केला जातो, यासाठी सदाचारी बना. परकीय देशांच्या भाषेचे ज्ञान घेताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करु नका. आपल्या मातृभूमीचा व मातृभाषेचा सदैव अभिमान बाळगा, असे त्यांनी सांगितले.

    नाविन्यपूर्ण बाबींचे अधिकाधिक ज्ञान ग्रहण करुन विद्यार्थ्यांनी विद्वान बनावे,असे सांगून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, ‘भारत’ हा प्राचीन काळापासून अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो, भविष्यात देखील आपला देश विविध बाबींमध्ये अग्रेसर ठरण्यासाठी आपल्या ज्ञानाचा देशहितासाठी उपयोग करा आणि जगभरात चांगले नाव कमवा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत, असे सांगून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये आजवर अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व संस्थेचे कौतुक केले.

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे तसेच त्यांना आपल्या शैक्षणिक संस्थेत टिकवून ठेवणे हे आव्हान असते. विद्यार्थी हिताचे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करुन त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करणे महत्वाचे असते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेत विविध चांगल्या संकल्पना व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

    कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे म्हणाले, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाने नेहमीच भर दिला आहे. भविष्यात या संस्थेचा आणखी विस्तार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

    प्रास्ताविक संस्थेच्या सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले. संस्थेच्या वाटचालीबाबत प्रा. डॉ. अंजली सरदेसाई यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी मानले. सूत्रसंचालन कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांनी केले.