बंद

  17.02.2021: हिंदी भाषा प्रचार प्रसारात महात्मा गांधी, सैन्यदल यांचे योगदान मोठे : राज्यपाल

  प्रकाशित तारीख: February 17, 2021

  हिंदी भाषा प्रचार प्रसारात महात्मा गांधी, सैन्यदल यांचे योगदान मोठे : राज्यपाल

  · राज्यपालांच्या हस्ते हिंदुस्तानी प्रचार सभेचे ‘हिंदी पत्रिका प्रकाशन पुरस्कार’ प्रदान

  · ‘नया ज्ञानोदय’, ‘व्यंग यात्रा’ व ‘हंस’ मासिकांना पुरस्कार प्रदान

  · हिंदी भाषा लोकप्रिय होण्यात उर्दूचे देखील महत्वाचे योगदान

  · ‘स्वदेशी’, ‘स्वभाषा’ व ‘स्वसंस्कृती’च्या संवर्धनाकडे लक्ष देण्याचे आवाहन

  हिंदी ही संपूर्ण देशाला तसेच हृदयांना जोडणारी भाषा आहे. भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, मोरिशस आदींसह अनेक देशातील लोकांना हिंदी भाषा सहजतेने समजते. गुजराती भाषिक असलेले महात्मा गांधी व स्वामी दयानंद यांचेसह देशाची सैन्यदले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदी चित्रपट सृष्टी यांचे हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी अद्भुत योगदान राहिले आहे तसेच हिंदी भाषेच्या विकासात उर्दू भाषेचे देखील मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

  महात्मा गांधी यांनी सन १९४२ साली स्थापन केलेल्या हिंदुस्तानी प्रचार सभेतर्फे दिले जाणारे ‘महात्मा गांधी हिंदी पत्रिका प्रकाशन पुरस्कार’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. १७) राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

  दिल्ली येथून प्रकाशित होणाऱ्या ‘नया ज्ञानोदय’ ला प्रथम पारितोषिक, ‘व्यंग यात्रा’ला द्वितीय तर ‘हंस’ या नियतकालिकाला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६ हिंदी नियतकालिकांमधून उपरोक्त ३ मासिकांची निवड करण्यात आली.

  इंग्रजी भाषा येणे ही काळाची गरज आहे, हे मान्य आहे. परंतु, लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण हिंदी किंवा मराठी, बंगाली, यांसारख्या प्रादेशिक भाषेतून का होत नाही असा सवाल करून, सर्वांनी ‘स्वदेशी’, ‘स्वभाषा’ व ‘स्वसंस्कृती’च्या संवर्धनाकडे लक्ष देणे, ही महात्मा गांधींना सच्ची श्रद्धांजली ठरेल, असे मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केले.

  हिंदुस्तानी प्रचार सभेचे मानद सचिव फिरोज पैच यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी नया ज्ञानोदयचे संचालक मुदीत जैन, व्यंग-यात्राचे संस्थापक डॉ प्रेम जनमेजय व हंसच्या संपादिका रचना यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

  कार्यक्रमाला सभेचे मानद कोषाध्यक्ष अरविंद देगवेकर, साहित्यिक मंजू लोढा, संचालक संजीव निगम तसेच हिंदी भाषिक साहित्यिक, लेखक व इतर मान्यवर उपस्थित होते.

  **