बंद

    15.03.2022: राज्यपालांच्या हस्ते लोकमत कल्याण – डोंबिवली गौरव सन्मान प्रदान

    प्रकाशित तारीख: March 15, 2022

    राज्यपालांच्या हस्ते लोकमत कल्याण – डोंबिवली गौरव सन्मान प्रदान
    कल्याण डोंबिवलीची ओळख एक स्वतंत्र प्रतिभेचे महानगर अशी व्हावी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
    समाजातील अनाम कारागिरांचा देखील गौरव व्हावा

    कल्याण डोंबिवलीची ओळख मुंबईचे सॅटेलाईट शहर इतकीच न राहता एक स्वतंत्र प्रतिभेचे महानगर अशी ओळख व्हावी व त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    लोकमत समूहातर्फे देण्यात येणारे लोकमत कल्याण – डोंबिवली गौरव पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजकारण, समाजकार्य, कला, शिक्षण, साहित्य व उद्योग या क्षेत्रातील ५० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, रिजन्सी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक महेश अगरवाल, लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी, कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रामुख्याने उपस्थित होते.

    कल्याण शहराला मोठा इतिहास लाभला आहे. कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी योगदान देणारी विविध रत्ने शोधून त्यांना सन्मानित केल्याबद्दल राज्यपालांनी लोकमत समूहाचे अभिनंदन केले.

    समाजाच्या उभारणीमध्ये विविध प्रकारचे कामगार, कुशल कामगार, हस्तकला कारागीर, आदिवासी कलाकार हे निरपेक्षपणे योगदान देत असतात. हे सर्व लोक प्रसिद्धीपासून दूर राहून आपापले काम करीत असतात. लोकमत सारख्या सर्वदूर विस्तार असलेल्या वृत्तपत्राने अश्या अनाम कामगारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करावे जेणेकरून त्यांना काम करताना नवा हुरूप येईल असे राज्यपालांनी सांगितले.

    लोकमत वृत्तपत्र दररोज २.२५ कोटी लोकांपर्यंत पोहोचते असे सांगून लोकमत महाराष्ट्र व गोव्यातील प्रथम क्रमांकाचे वृत्तपत्र असल्याचे ऋषी दर्डा यांनी सांगितले. लोकमत वाहिनी तसेच डिजिटल माध्यम यांच्या वाढत्या व्याप्तीबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.

    कल्याण डोंबिवलीचा कायापालट होतोय: आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी

    कल्याण येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची उभारणी केली होती. आज कल्याण डोंबिवलीचा कायापालट होत आहे. या ठिकाणी नौदलाचे स्मारक, रिव्हर फ्रंट विकास होत आहे तसेच उद्यान, कबड्डी स्टेडियम, क्रीडा संकुल, नवे रुग्णालय, कॅन्सर रेडिएशन सेंटर देखील निर्माण होत आहे. हे शहर नागरिकांच्या सहकार्याने आपण देशात नावारूपाला आणू असे प्रतिपादन कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते महेश अगरवाल, डॉ विजय सूर्यवंशी, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, डॉ अशिष दादासाहेब धडस, डॉ अनिल अशोक हेरूर, ॲड . संजय भगुराम मोरे, डॉ सचिन राजाराम अहिरे, सचिन दत्तात्रय पोटे, ॲड सोपान विठठल बुदबाडकर, गोरखनाथ सखाराम म्हात्रे डॉ सुनिल गणपत खर्डीकर, संकेत सुनिल खर्डीकर, मुनिर छबुलाल मुल्ला, मच्छिन्द्र युवराज कांबळे, सचिन अर्जुन कदम, हेमंत कुमार आनंदा नेहाते, दिनेश हिरामण पाटील, विनोद तिवारी, शैलेश तिवारी, प्रकाश गोपीनाथ भोईर, डॉ भुषण बाळकृष्ण सोनवणे, पुनम नारायण शेटटी, डॉ सुनिता बाबुराव पाटील, डॉ सुशिल दुबे, जितेंन्द्र लक्ष्मण पटेल, विजय बबन गावडे, गजानन मोतिराम पाटील, दर्शना अनंत सामंत, राजन दत्ताजी मराठे, मकरंद रमेश पाटील, जगन्नाथ सखाराम शिंदे, प्रल्हाद परशुराम म्हात्रे, अनंत विठठल गोसावी, कुणाल दिनकर पाटील, भास्कर विजय अजगावकर, विजय प्रभाकर भोसले, किर्ती अनिल परब, अमित भास्कर म्हात्रे, डॉ महेश बालक‍िशन गोसावी, संदीप पांडूरंग पाटील, रवीना अमर माळी, प्रेमजी जेठालाल गाला, नमिता मयुर पाटील, डॉ योगेश विजय जोशी, अनिल स‍िताराम म्हात्रे, संजय बाबुराव मोरे, डॉ रविद्र रघुनाथ जाधव, डॉ राजकुमार एम कोल्हे, मंदार श्रीकांत हलबे, योजना संदीप गाईकर यांना सन्मानित करण्यात आले.

    सुरुवातीला राज्यपालांनी लोकमतचे संस्थापक दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.