बंद

  13.09.2023 : जैन धर्म हितेशी’ सन्मानाने राज्यपाल रमेश बैस सन्मानित

  प्रकाशित तारीख: September 13, 2023

  ‘जैन धर्म हितेशी’ सन्मानाने राज्यपाल रमेश बैस सन्मानित

  ‘पर्युषण’ हा आंतरिक शुद्धीचा सण*: राज्यपाल

  राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. १३) श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्संग श्रवण केले तसेच उपस्थितांना संबोधित केले.

  यावेळी मिशनचे गुरुदेवश्री राकेशजी यांच्या हस्ते राज्यपालांना झारखंड येथील पवित्र जैन तीर्थस्थळ ‘श्री सम्मेत शिखरजी’ पर्यटन स्थळ होण्यापासून वाचवल्याबद्दल ‘जैन धर्म हितेशी’ उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले.

  जगातील काही लोक ऐश्वर्याने जगत असतील आणि बहुसंख्य लोक गरिबीत जीवन कंठत असतील, तर कोणतीही व्यक्ती शांततेत जगू शकणार नाही, असे सांगून आपल्या कमाईचा एक दशमांश भाग तरी सधन व्यक्तींनी जगातील दुःखी व अभावग्रस्त लोकांच्या सेवेसाठी ठेवला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

  ‘पर्युषण’ हा आंतरिक शुद्धीचा सण आहे. हा सण मनुष्य तसेच प्राणीमात्र अश्या प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करणारा आहे. त्यामुळे पर्युषण हा सृष्टीचा सण आहे असे सांगताना राज्यपालांनी पर्युषणानिमित्त केल्या जाणाऱ्या क्षमायाचनेच्या गुणाचे महत्व सांगितले.

  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्याच्या प्रत्येक भागात वेळोवेळी संतांचे अवतरण झाले. महात्मा गांधी यांच्यावर ज्यांच्या विचारांचा प्रभाव होता, असे संत श्रीमद राजचंद्र यांनी देखील मुंबईत काही काळ व्यतीत केला होता. श्रीमद राजचंद्र मिशनचे अध्यात्मिक गुरु राकेशजी हे श्रीमद राजचंद्र यांचे कार्य पुढे नेत आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.

  यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘डिलिंग विथ एंगर इफेक्टिव्हली’ व ‘रिलीजींग एंगर मेडिटेशन’ या क्रोध नियंत्रण या विषयावरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यात्मिक प्रमुख गुरुदेवश्री राकेश जी यांनी पर्युषण निमित्त प्रवचन केले.