बंद

    12.09.2020 : अत्याधुनिक शिक्षणाला संस्कारांची जोड द्यावी राज्यपालांची शिक्षकांना सूचना

    प्रकाशित तारीख: September 12, 2020

    ‘अत्याधुनिक शिक्षणाला संस्कारांची जोड द्यावी’ राज्यपालांची शिक्षकांना सूचना’

    ‘विद्यार्थ्यांना संस्कृतसह भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रेरित करावे’

    विद्यार्थ्यांना नविनतम तसेच अत्याधुनिक शिक्षण देताना शिक्षकांनी भारतीय जीवनमूल्ये, संस्कार व आदर्शांची जोड द्यावी अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील शिक्षकांना केली.

    नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय संस्कार व निती मूल्यांवर विशेष भर दिला असल्याचे सांगून शिक्षणाला शाश्वत जीवनमूल्यांची जोड दिल्यास विद्यार्थ्यांच्या उत्तम पिढ्या तयार होतील व त्यातून समर्थ भारताची निर्मिती होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

    शिक्षण दिनाचे औचित्य साधून मुंबईतील नामवंत शाळांच्या प्राचार्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून ‘आयकॉनिक लिडरशिप अवॉर्ड्स’ प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    इंग्रजीसह विदेशी भाषांचे अध्ययन अवश्य करावे परंतु शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कृतसह भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रेरित करावे कारण भारतीय भाषांना स्वतःचे निहित सौंदर्य आहे असे राज्यपालांनी सांगितले.

    ‘इनोव्हेटिव्ह स्कूल्स युनियन’ या संस्थेतर्फे ‘आयकॉनिक लिडरशिप अवॉर्ड्स’ वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा व माजी शरीफ डॉ. इंदू शहानी, विश्वस्त सिद्धार्थ शहानी, विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

    आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमीच्या प्राचार्या राधिका सिन्हा, बॉम्बे स्कॉटीश स्कूलच्या प्राचार्या सुनीता जॉर्ज, बॉम्बे इंटरनेशनल स्कुलचे प्राचार्य सायरस वकील यांसह २२ नामवंत शाळांच्या प्राचार्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

    *****