बंद

    11.08.2022: जव्हार येथील आदिवासी बांधवांचे राज्यपालांसोबत ‘रक्षाबंधन’

    प्रकाशित तारीख: August 11, 2022

    जव्हार येथील आदिवासी बांधवांचे राज्यपालांसोबत ‘रक्षाबंधन’

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पालघरच्या जव्हार तालूक्यातील विविध गांवामधील आदिवासी बांधवांनी तसेच लहान मुलांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसोबत राजभवन येथे रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

    तारपा नृत्याने राज्यपालांचे स्वागत केल्यावर आदिवासी भग‍िनींनी राज्यपालांना राखी बांधली. यावेळी लहान मुलांनी सर्वधर्मसमभाव व विविधतेतून एकतेचा संदेश देणारे लघु नाट्य सादर केले.

    आदिवासी बांधवांचे राजभवन येथे स्वागत करताना राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

    गेल्या तीन वर्षात आपण राज्यातील विविध आदिवासी भागांना भेटी दिल्या. पालघर – नंदुरबारचे असो किंवा ओरिसा – उत्तराखंण्डचे असो, आदिवासी बांधवांच्या भाषा – बोली वेगवेगळ्या असतील परंतु त्यांचे नृत्य समान आहे, संगीत समान आहे. या समानतेच्या धाग्याने सर्व आदिवासी बांधले आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.

    देशात आदिवासी सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्यशासन तसेच केंद्र शासन विशेष प्रयत्न करीत आहे. आद‍िवासी बांधवांनी शिक्षण, रोजगार व उदमशिलतेतून स्वतःचा विकास साधावा, मात्र आपली भाषा व संस्कृती जोपासावी, असे राज्यपालांनी सांगितले. समस्त आदिवासी बांधवांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उदाहरण डोळयासमोर ठेवावे व आपली उन्नती साधावी असे आवाहन राज्यपालांनी केले.

    सुरुवातीला राज्यपालांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या बांबू उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी वाळवंडा येथील वयोवृध्द तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांनी राज्यपालांना संजय पऱ्हयाड यांनी काढलेले वारली चित्र भेट दिले.

    आदिवासीच्या राजभवन भेटीचे आयोजन नवीन शेटटी संचलित क्रिश स्पोर्टस फाऊंडेशन या संस्थेतर्फे करण्यात आले होते.