बंद

  11.02.2022 : राजभवनातील नव्या दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन संपन्न

  प्रकाशित तारीख: February 11, 2022

  राजभवनातील नव्या दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन संपन्न

  राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित

  “राजभवन लोककल्याणकारी उपक्रमांचे केंद्र होईल” : राष्ट्रपती राम नाथ कोविंद

  “‘लोकभवन’ करण्यासाठी प्रयत्न केले’ : राज्यपाल कोश्यारी

  लोकशाही प्रणालीमध्ये राजभवने जनसामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. लोकशाही व्यवस्थेमध्ये ‘दरबार’ हे सार्वजनिक जीवनातील पारदर्शिकतेचा पुरस्कार करतात. आजच्या संदर्भात ‘दरबार हॉल’ हे लोकशाहीचे नवे प्रतीक झाले असून राजभवन हे लोक कल्याणकारी उपक्रमांचे केंद्र होईल, असा आशावाद राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे व्यक्त केला.

  राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ११) राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

  कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री अदिती तटकरे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी राज्यपाल राम नाईक, डॉ डी वाय पाटील व पद्मनाभ आचार्य तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

  दरबार हॉलच्या उदघाटनानिमित्त राज्यातील जनतेचे अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्याच्या महानतेला विविध आयाम असल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले. संतांची, वीरांची व समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र हे आज देशातील प्रमुख आर्थिक व सांस्कृतिक केंद्र झाले असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. यावेळी राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ हेडगेवार यांचा कार्याचे स्मरण केले. दिवंगत पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचे संगीत अमर असल्याचे त्यांनी सांगितले.

  “’लोकभवन’ करण्यासाठी प्रयत्न केले”: राज्यपाल कोश्यारी

  आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपण राजभवनाला लोकभवन बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठांनी करोना काळात अधिकाधिक योगदान द्यावे या दृष्टीने आपण कुलपती या नात्याने विद्यापीठांना सूचना केल्या, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील विद्यापीठांमध्ये संरक्षण विषयक अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी तसेच मुंबई विद्यापीठात सागरी विज्ञान संस्था सुरु करण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

  आदिवासी कातकरी समाजातील अंदाजे २३००० लोकांना हक्काची घरे / जमीन देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे सांगताना राजभवन येथील भूमिगत तळघरात (बंकर) स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची गॅलरी लवकरच सुरु करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

  ‘मजुरांबद्दल कृतज्ञता’

  राजभवनात दरबार हॉल बांधण्यासाठी कष्ट केलेल्या मजुरांबद्दल राज्यपालांनी यावेळी आपली कृतज्ञता व्यक्त केली. दोन अडीच वर्षांच्या बांधकामाच्या काळात स्वतः अडचणींचा सामना करून सुंदर दरबार हॉल निर्माण केल्याबद्दल त्यांनी सर्व मजुरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

  देशभरातल्या राजभवनातील दरबार हॉलचे नाव बदलून त्यांना संतांची नावे देण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना करताना महाराष्ट्र राजभवनातील नव्या दरबार हॉलला ‘समर्थ सभागृह’ असे नाव देणे योग्य ठरेल असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

  ‘देशातील सर्वोत्तम राजभवन’: मुख्यमंत्री

  तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले महाराष्ट्र राजभवन हे देशातील सर्वोत्तम राजभवन असून अशी वास्तू अन्यत्र शोधूनही सापडणार नाही. या राजभवनात आपण शिवसेना प्रमुखांसोबत माजी राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंह यांना तसेच अनेक राज्यपालांना भेटल्याचे सांगून राजभवनातील नवा दरबार हॉल सशक्त लोकशाहीतील घडामोडी पाहण्यासाठी सुसज्ज झाला आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

  राजभवनाच्या जुन्या दरबार हॉलचा वारसा जपून त्याचे नूतनीकरण केल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. राजभवनाने पारतंत्र्यातील काळ पाहिला तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा पाहिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

  यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते दरबार हॉलच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले तसेच प्रवेशद्वार पूजन करण्यात आले.

  यावेळी दरबार हॉलचा इतिहास सांगणारा माहितीपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ नितीन आरेकर यांनी केले तर राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी आभार प्रदर्शन केले.

  **

  राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता २२५ इतकी होती.

  जुन्या दरबार हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी ही अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉल शपथविधी सोहळे, शासकीय कार्यक्रम, पोलीस अलंकरण समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्थळ म्हणून ओळखला जाऊ लागला.

  इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.

  शंभर वर्षांहून अधिक काळ लाटा व वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे २०१६ नंतर त्याचा वापर थांबविण्यात आला व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला.

  नव्या दरबार हॉलचे बांधकाम २०१९ साली सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर २०२१ मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.

  दरबार हॉलचा इतिहास

  दरबार हॉल हे आयताकृती सभागृह सन १९११ साली बांधण्यात आले होते. राज्यपालांचे निवासस्थान असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू तसेच राज्यपालांचे सचिवालय यांच्या मधल्या जागेत दरबार हॉल बांधण्यात आला.

  दरबार हॉलच्या भव्य पोर्चच्या दर्शनी भागात जमिनीखाली राजभवनातील ऐतिहासिक तळघराचे (बंकर) प्रवेशद्वार आहे. इथून नागमोडी वळणे घेत हे तळघर ‘जलचिंतन’ या अतिथीगृहाखालून उघडते.

  दिनांक १० डिसेंबर १९५६ साली श्री प्रकाश यांनी जुन्या द्विभाषिक मुंबई राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली त्यावेळी दरबार हॉलचे नाव ‘जल नायक’ असे होते.

  दरबार हॉलच्या समोरील आणि मागील बाजूंना ‘जीवन वृक्ष’ ही संकल्पना असलेली सिल्क वस्त्रावर केलेली मोठी पेंटिंग्स होती.

  बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीत राज्यपालांना विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे ‘दरबार हॉल’ किंवा ‘जल सभागृह’ हा राजभवनातील सर्वात व्यस्त परिसर असतो.

  **