बंद

  09.03.2022: विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ९ महिलांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान

  प्रकाशित तारीख: March 9, 2022

  विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ९ महिलांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान
  आगामी युग महिलांचे, पुढील काळात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होतील* : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  विविध क्षेत्रात आपल्या विलक्षण प्रतिभेचा आणि उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ९ महिलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.9) जागतिक महिला दिनानिमित्त ‘नवदुर्गा’ सन्मान प्रदान करण्यात आले.

  पल्लवी फाउंडेशन व स्वामीराज प्रकाशनतर्फे दामोदर हॉल परळ मुंबई येथे ‘जागर स्त्रीच्या आत्मभानाचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान देण्यात आले.

  कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते व नाट्य निर्माते प्रशांत दामले, पल्लवी फाउंडेशनच्या अध्यक्षा शलाका कोरगावकर, स्वामीराज प्रकाशनच्या रजनी राणे, भाऊ कोरगावकर, अनिल जोशी, ऍड नैना परदेशी आदी उपस्थित होते.

  समाजातील कर्तृत्ववान महिलांना शोधून त्यांना नवदुर्गा सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल पल्लवी फाउंडेशन व स्वामीराज प्रकाशन संस्थेचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मातृशक्तीचा गौरव केला. देशात अनादी काळापासून महिलांना सन्मान दिला जायचा. मधल्या काळात विक्षेप आला. परंतु आज महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. आगामी युग महिलांचे असून पुढील काळात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होतील, असे राज्यपालांनी सांगितले. .

  या कार्यक्रमात दृष्टिबाधित असून देखील अनेक वाद्यात पारंगत असलेल्या योगिता तांबे, कचऱ्यात गेलेल्या टेट्रापॅकचा पुनर्वापर करणाऱ्या लता पाटील, मराठी शाळांच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या क्षमा गडकरी, गडकिल्ले संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सुवर्णा वायंगणकर, जबाबदार नेटिझन्स निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सोनाली पाटणकर, रुग्णसेवेला समर्पित डॉ माया परिहार, नगरसेविका सोनम जामसुदकर, भटक्या कुत्र्यांना मायेची ऊब देणाऱ्या उमा गटानी व योग प्रशिक्षिका रूपा ध्रुव चापेकर यांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान देण्यात आले.

  कार्यक्रमात भूषण नेमळेकर, विक्रम मेहता, जाहिरात क्षेत्रातील मनोज चौधरी, औषध निर्माण उद्योगातील आशिष मंगल व जळगाव येथील होमिओपॅथी डॉक्टर सुनील दत्त चौधरी यांना राज्यपालांच्या हस्ते ‘सावली’ पुरस्कार देण्यात आले.

  यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘रंगबावरी’ या मानिनी चौसाळकर संपादित मराठी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

  कार्यक्रमापूर्वी व नंतर ‘उंच माझा झोका’ हा महिलांच्या संगीत वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला.