बंद

  08.03.2022: महिला दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवनातील महिला कर्मचाऱ्यांसोबत स्नेहभोजन

  प्रकाशित तारीख: March 8, 2022

  महिला दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवनातील महिला कर्मचाऱ्यांसोबत स्नेहभोजन

  आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे कार्यरत असलेल्या ४९ महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत भोजन घेतले व संवाद साधला.

  यावेळी राजभवनातील श्रमिक महिला कर्मचारी, महिला स्वच्छता कर्मचारी, उद्यान विभाग, खानपान विभाग, शिक्षण व प्रशासन विभाग येथील महिला कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

  राजभवन येथे कार्य करीत असताना एकत्रितपणे सर्वांना भेटणे शक्य होत नाही. त्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून आपणांसमवेत भोजन आयोजित केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

  राजभवन परिसर सुंदर व स्वच्छ ठेवण्यात महिलांचे योगदान मोठे आहे. कौटुंबिक जबाबदारी पार पाडून कार्यालयाचे काम सक्षमपणे करीत असल्याबद्दल राज्यपालांनी महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

  कोणतेही काम मग ते स्वच्छता ठेवणे असो, बागकाम असो किंवा कार्यालयीन कामकाज असो, लहान किंवा मोठे नसते. आपल्या वाट्याला आलेले काम अधिकाधिक चांगले कसे करता येईल याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

  आपण समाजासाठी व देशासाठी काम करीत आहोत, ही भावना ठेवली तर कामाचा आनंदही घेता येईल व काम सर्वोत्तम होईल असे राज्यपालांनी सांगितले. महिला कर्मचाऱ्यांसोबत जेवताना आपण कुटुंबातील सदस्यांसोबत भोजन करीत आहोत असे वाटत असल्याची भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

  ज्या सभागृहात राज्यपाल देश विदेशच्या पाहुण्यांसाठी शाही-भोज ठेवतात त्या जलविहार सभागृहात आज प्रथमच महिला कर्मचाऱ्यांसोबत भोजन आयोजित केल्याबद्दल महिला कर्मचाऱ्यांनी राज्यपालांचे आभार मानले.

  यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल, प्राची जांभेकर प्रामुख्याने उपस्थित होते.