05.02.2023 : ३६००० महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या जनशिक्षण संस्थानला राज्यपालांकडून कौतुकाची थाप
३६००० महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या जनशिक्षण संस्थानला राज्यपालांकडून कौतुकाची थाप
रायगड जिल्ह्यातील ४०० यशस्विता महिलांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
कौशल्य प्रशिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झालेल्या रायगड जिल्ह्यातील ४०० यशस्विता महिलांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी राजभवन येथे सत्कार केला.
जनशिक्षण संस्थान, रायगड या संस्थेने कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनविलेल्या या प्रशिक्षित महिलांचा ‘पंखांना बळ कौश्यल्याचे : यशस्वितांचा सत्कार’ या कार्यक्रमा अंतर्गत सामूहिक सत्कार करण्यात आला.
देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील ३६००० महिलांना विविध जीवनोपयोगी कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनविण्याचे फार मोठे काम जनशिक्षण संस्थान या संस्थेने केले असल्याचे सांगून राज्यपालांनी संस्थेला कौतुकाची थाप दिली.
या उपक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती, आदिवासी तसेच अल्पसंख्यांक समाजातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिल्यामुळे प्रत्येक महिलेचे मासिक उत्पन्न ३००० रुपयांपासून १७००० रुपयांपर्यंत वाढले आहे, ही समाधानाची बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शेतीला शेळीपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन यांसारख्या धंद्याची जोड दिली पाहिजे असे सांगून आज आदिवासी भागातील बांबू फर्निचर, बांबू राख्यांना मोठी मागणी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमाला जनशिक्षण संस्थान, रायगडचे अध्यक्ष डॉ नितीन गांधी, निमंत्रक डॉ मेधा सोमैय्या, युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ किरीट सोमैया, यशस्विता रत्नप्रभा बेल्हेकर, डॉ विजय कोकणे आदी उपस्थित होते. संस्थेने रायगड जिल्ह्यातील ३६००० अर्धशिक्षित, निम्नशिक्षित आणि शेतकरी कुटुंबातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले आले असे डॉ मेधा सोमैया यांनी सांगितले. यावेळी कल्पना विनोद म्हात्रे या यशस्विता महिलेने आपले मनोगत व्यक्त केले.