बंद

  03.05.2022: राज्यपालांची मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेला भेट

  प्रकाशित तारीख: May 3, 2022

  राज्यपालांची मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेला भेट

  कोळी बांधवांच्या प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करणार : राज्यपाल कोश्यारी यांचे कोळी महिलांना आश्वासन

  कोळी बांधवांच्या उपजीविकेच्या समस्या गंभीर आहेत. या समस्यांचा अभ्यास करून त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले.

  मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेतर्फे मंगळवारी (दि. ३) अक्षय तृतीयेनिमित्त मरोळ अंधेरी मुंबई येथे कोळी समाज सामाजिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

  मासळी बाजार सुरक्षित राहावे परंतु समुद्र किनारा देखील सुरक्षित राहावा या मताचे आपण आहोत असे सांगून कोळी समाजाच्या समस्येत आपण लक्ष घालू ; परंतु आपला लढा शांततापूर्ण मार्गानेच लढावा अशी सूचना राज्यपालांनी केली.

  कोळी समाज हा भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक असलेल्या पहिल्या मत्स्य अवताराचा वारसा सांगणारा समाज असून समाज बांधवांनी याचा सार्थ अभिमान बाळगावा असे राज्यपालांनी सांगितले.

  मुंबई ही कोळ्यांची होती. परंतु आज कोळी समाज, कोळीवाडे व किनारपट्ट्या उध्वस्त होत आहेत. डिझेल अनुदान नसल्यामुळे कोळ्यांची एकही बोट सुरु नाही त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे मरोळ मासळी बाजार संघाच्या अध्यक्षा राजश्री भानजी यांनी सांगितले.

  यावेळी कोळी महिलांनी राज्यपालांना कोळी टोपी परिधान केली व सजवलेली होडी भेट दिली. संस्थेच्या सचिव प्रतिभा वैती पाध्ये यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला माजी खासदार संजय निरुपम हे देखील उपस्थित होते.