बंद

    03.02.2021 : ‘नॅब’च्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य प्रेरणादायी : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: February 3, 2021

    ‘नॅब’च्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य प्रेरणादायी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    नाशिक दिनांक 3 फेब्रुवारी 2021 (जिमाका वृत्तसेवा): शंभर हातांनी घेऊन, हजारो हातांनी दान देण्याची भारतीय परंपरा आहे. यास अनुसरून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दृष्टीबाधित दिव्यांगाना आत्मनिर्भर करण्याचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

    सातपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र, नाशिकच्या निवासी वसहतीगृहाचे भूमीपूजन कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी नॅब महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष देवकिसनजी सारडा, नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, नॅब महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुर्यभान साळुंखे, नॅब महाराष्ट्राचे विश्वस्त अशोक बंग, मानद महासचिव गोपी मयूर, नॅब नाशिकचे चेअरमन व सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजेंद्र कलाल यांच्यासह नॅबचे पदाधिकारी, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

    राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, दृष्टीबाधित व दिव्यांगांना आत्मविश्वासाने जगण्याचे शिक्षण देणाऱ्या सर्व प्रशिक्षकांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग व दृष्टिबाधित मुलींनी रोप मल्लखांबाचे दाखवलेले प्रात्यक्षिक सर्वांना प्रेरणा देणारे आहे. तसेच दानशूर व्यक्तींमुळेच नॅबसारख्या सामाजिक संस्थांचे कार्य अविरतपणे सुरू राहण्यासाठी आश्रयदात्यांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी केले आहे.

    दिव्यांगामध्ये असलेल्या आंतरिक ऊर्जेमुळे त्यांच्या आयुष्यातील ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास वाढून त्यांना दिव्यांगत्वावर मात करणे शक्य होत असते. दिव्यांग व बहुविकलांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व प्रशासनामार्फत आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच नवीन वास्तू लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केली.

    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. कलंत्री यांनी संस्थेच्या स्थापनेपासून दिव्यांग व बहुविकलांगांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. नॅबसाठी 90 टक्के निधी हा आश्रयदात्यांकडून मिळत असतो. दिव्यांगांच्या मुलभूत अधिकारांसाठी नॅब कार्य करत असून नॅबच्या माध्यमातून दिव्यांग व दृष्टिबाधितांसाठी शिक्षण आणि रोजगारावर भर देण्यात येत असतो. याअनुषंगाने दिव्यांगांना आत्मनिर्भर आयुष्य जगता यावे यासाठी शासनामार्फत अनुदान मिळावे, अशी अपेक्षा यावेळी श्री. कलंत्री यांनी व्यक्त केली.

    संस्थापक अध्यक्ष देवकिसनजी सारडा यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे नॅबचा विस्तार झाला, असे सांगून नाशिक परिसरात निर्माण झालेल्या संस्थांची नॅबला मदत झाल्याचे सांगितले.

    तत्पूर्वी राज्यपाल महोदयांनी शाळ व वसहतिगृह परिसराला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिल्या सेन्सरी गार्डनला यावेळी भेट देवून त्याबाबत माहिती जाणून घेतली. यांनतर दिव्यांग मुलींनी केलेल्या रोप मल्लखांब प्रात्याशिक्षकांचे निरिक्षण केले.
    कार्यक्रमा दरम्यान नॅब संस्थेला देणगी देणाऱ्या आश्रयदात्यांचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा सुवर्ण पदक विजेत्या वेदांत मुंदडा या दृष्टिबाधित विद्यार्थ्याचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

    दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, संशोधन तसेच विशेष शिक्षणासंदर्भात अद्ययावत ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी संशोधन व प्रशिक्षण विद्यार्थी निवासी वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या वसतिगृहात सुमारे 60 मुलींच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून वसतिगृहाच्या उभारणीसाठी 3 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामध्ये उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी, विषयतज्ज्ञ, व्याख्याते, प्रशिक्षणार्थींना अद्ययावत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

    या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव उपस्थित होते.
    00000000