बंद

  02.03.2021 : ‘आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये मुक्त व दूरस्थ शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे योगदान सर्वाधिक‘: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  प्रकाशित तारीख: March 2, 2021

  ‘आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये मुक्त व दूरस्थ शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे योगदान सर्वाधिक‘: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  कौटुंबिक जबाबदारी, शेती व व्यवसाय सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये योगदान सर्वाधिक असून पारंपरिक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांपेक्षा ते निश्चितच जास्त असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी (दि. २ मार्च) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षांत समारोहात राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांना आभासी पद्धतीने पदवी प्रदान करण्यात आली.

  मुक्त आणि दूरस्थ पद्धतीने कमी खर्चात परिश्रमपूर्वक शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्थार्जन करताना देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील योगदान देत आहेत, ही उल्लेखनीय बाब असल्याचे उद्गार राज्यपालांनी आपल्या दीक्षांत भाषणात काढले.

  ‘करोंना काळात सर्वच विद्यापीठांचे दूरस्थ शिक्षण’

  करोना काळात टाळेबंदी जाहीर मुळे घरूनच शिक्षण घेणे आवश्यक झाले. अश्यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची तंत्रज्ञानवर आधारित दूरस्थ शिक्षण पद्धती सर्व विद्यापीठांसाठी मार्गदर्शक ठरली. याकाळात तंत्रज्ञान, रेडिओ व टीव्हीचा शिक्षणासाठी वापर वाढून शिक्षण क्षेत्रात एक प्रकारे क्रांती आली. ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा लाभ मिळाला, असे राज्यपालांनी सांगितले.

  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने केंद्र सरकारच्या कृषि विज्ञान केंद्रांसोबत काम करून शेतकर्‍यांना माहिती व योग्य प्रशिक्षण देण्याची सोय केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

  ज्ञानगंगा ही निरंतर वाहती असते, असे सांगून पदवी प्राप्त झाल्यावर स्नातकांनी आपले शिक्षण न थांबवता निरंतर शिक्षण सुरू ठेवून चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

  मुक्त विद्यापीठाचा अहवाल सादर करताना विद्यापीठाने १,९१,१२८ विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, व्हायवा व नियमित परीक्षा घेतल्या तसेच ६ लाख विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्रवाहाशी जोडले अशी माहिती कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी यावेळी दिली. करोना काळात विद्यापीठाने मुख्यमंत्री सहायता निधीला १० कोटी रुपयांचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

  दीक्षांत समारोहात २५ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके व ८१ बक्षिसे व २०१९ व २०२० या दोन वर्षांच्या मिळून २,९३,८५२ पदव्या प्रदान करण्यात आल्या.