बंद

    ४.६. 2020 आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

    प्रकाशित तारीख: June 4, 2020

    वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट
    आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

    राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखडयाला मंजूरी दिली आहे.

    राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज (४ जून) राज्यपालांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परिक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखडा सादर केला. विद्यापीठाने परिक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे यावेळी राज्यपालांनी कौतूक केले.

    राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केले असल्याचे सांग‍ितले. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकुल असल्यास सर्व लेखी परिक्षा १५ जूलै ते १५ ऑगष्ट या कालावधीत घेण्यात येतील. करोना परिस्थितीमुळे या कालावधीत परिक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परिक्षा १६ ऑगष्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल.

    उपरोक्त दोन्ही पर्यायांनुसार परिक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने परिक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात घेतील.

    आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे परिक्षांचा आराखडा तयार करताना सर्व संबधित घटकांशी, माजी कुलगुरु, प्रकुलगुरुंशी तसेच नियामक संस्थांशी विचारविनिमय केल्याचे अमित देशमुख यांनी राज्यपालांना सांगितले.

    या संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिचर्या परिषद, वैद्यकीय परिषद तसेच इतर केंद्रीय संस्थाशी देखील सल्लामसलत केल्याचे त्‍यांनी सांगितले.

    आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रस्तावाला राज्यपालांनी दिलेल्या मंजूरीबाबत विद्यापीठाच्या कुलगुरुंना देखिल स्वतंत्रपणे कळविण्यात आले आहे