बंद

    राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ संपन्न

    प्रकाशित तारीख: February 22, 2019

    कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५५ व्या दीक्षान्त समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते स्नातकांना पदवी प्रदान करुन संपन्न झाला. या समारंभास तिरुचिरापल्ली येथील आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ४८ हजार ५१५ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.

    शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या ५५ व्या दीक्षान्त समारंभास राज्यपाल चे. विद्यासागर राव, डॉ. भीमराया मेत्री यांच्यासह कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र. कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, प्रा. डॉ. एन.डी.पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्नातकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, नवस्नातक पदवी, पदविका, प्रमाणपत्रे घेऊन नव्या युगात प्रवेश करीत असताना आपल्या वाणी व कृतीतून आपली पात्रता सिद्ध करावी.

    मोठी स्वप्ने पाहा, नवतंत्रज्ञान आत्मसात करा – डॉ. भीमराया मेत्री

    याप्रसंगी बोलतांना तिरुचिरापल्ली येथील आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री म्हणाले, स्नातकांनो मोठी स्वप्ने पाहा, सृजनशील बना, सातत्याने आत्मपरीक्षण करा व सर्वोत्कृष्टतेचा ध्यास धरा. नवतंत्रज्ञान आत्मसात करा आणि भारतीय मूल्यसंस्कृती जोपासा. भारतीय मूल्यांचे महत्त्व विषद करताना डॉ. मेत्री म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात नीतीमूल्यांशी कधीही तडजोड करू नये. जागतिक मंदीच्या काळातही भारतीय कंपन्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला सहाय्यभूत होईल, अशीच कामगिरी केली आहे. जगातील प्रमुख तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश ही भारताच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. नम्रता, सहनशीलता आणि स्नेहभावाने साऱ्या जगाला आपण जोडू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    स्नातकांनी आपल्या विद्यापीठाचे, देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा ध्यास धरावा, असे आवाहन करून डॉ. भीमराया मेत्री म्हणाले, दैनंदिन जीवनात आपल्या हातून होणारे प्रत्येक काम सर्वोत्कृष्टच असले पाहिजे, असे जेव्हा तुम्ही ठरवाल, तेव्हाच हा ध्यास पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करील. जीवन हा केवळ स्वतःचा शोध नव्हे, तर स्वतःला घडविण्याची कार्यशाळा आहे. जीवनात कोणत्याही ध्येयशक्तीला कोणतीही मर्यादा नाही. ही मर्यादा आपणच स्वतःच्या मनात घालून ठेवतो. स्वतःला त्या मर्यादेच्या भावनेतून बाहेर काढा. नवता, नवनिर्मिती आणि सृजनशीलता या गुणांच्या बळावरच तुम्ही स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करू शकता. नवनिर्मिती ही आपल्या गुणसूत्रांतच असायला हवी, असेही ते म्हणाले.

    डिजिटल युगात जन्मलेली आपली पिढी ही खरोखरच भाग्यवान असल्याचे सांगून डॉ. भीमराया मेत्री म्हणाले, लॅपटॉप, स्मार्टफोन्स, समाजमाध्यमे अशा वैविध्यपूर्ण बाबींनी सजलेल्या डिजिटल युगातील आपण सारे विद्यार्थी ज्ञानयुगाचे वारकरी आहात. सध्या भारत जागतिक स्तरावर गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगातल्या आघाडीच्या तीन देशांपैकी एक होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. साहजिकच तरुणांकडून देशाला अपेक्षाही तितक्याच मोठ्या आहेत. उच्च प्रतीची कौशल्ये, ज्ञान, स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता हे या युगातील कळीचे शब्द आहेत, हे ध्यानी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. सध्याचे युग हे रोबोटिक्सचे असून व्यावसायिक निर्णय हे पारदर्शी पद्धतीने होण्याच्या दृष्टीने रोबोट्सनी घेतलेल्या निर्णयांना महत्त्व प्राप्त होत आहे, हेही लक्षात ठेवा. बदलत्या परिस्थितीमध्ये आपणही सातत्याने नवनवीन ज्ञान, कौशल्ये आत्मसात करीत लवचिक भूमिका घेत या गतिमान व्यावसायिक जगतात आपले स्थान कायम राखले पाहिजे. सध्याचे युग हे अशा प्रकारे खरे तर नवतेचे आणि जुन्याचा विध्वंस करणारे आहे. त्यामुळे या परिस्थितीत विद्यार्थ्यांनीही सृजनशीलता आणि नवीन तंत्रज्ञानाचा अंगिकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

    जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अपयशाची भीती बाळगू नका. धोका पत्करायला घाबरू नका. जेव्हा तुम्ही परिस्थितीसमोर न डगमगता उभे राहता, तेव्हाच चमत्कार घडतात. मी स्वतः माझ्या आयुष्यात प्रगतीच्या शिड्या खूप भराभर चढलो. माझ्या या यशाचे रहस्य माझ्या अपयशांतच दडलेले आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो, असेही डॉ. मेत्री यांनी सांगितले.

    यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. ते म्हणाले, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, संशोधनातून उद्योगनिर्मिती, नाविन्यपूर्ण व अभिनव संशोधन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि भविष्यवेधी अभ्यासक्रम या पंचसूत्रीचा आधार घेऊन शिवाजी विद्यापीठाने आपली वाटचाल चालविली आहे. ‘क्यू.एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’च्या वतीने ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांसाठी स्वतंत्र रँकिंग (क्यू.एस. ब्रिक्स इंडिया रँकिंग) घेण्यात येते. त्यात यंदा प्रथमच भारतातील शैक्षणिक संस्थांसाठी स्वतंत्रपणे क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिवाजी विद्यापीठाची क्रमवारी ५६-६० अशी आहे; तर, ‘ब्रिक्स’ देशांतील शैक्षणिक संस्थांमध्ये ही क्रमवारी २५१-२६० अशी आहे. शैक्षणिकदृष्ट्या जागतिक महत्त्वाच्या संस्थेने शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाच्या योगदानावर शिक्कामोर्तब करणे, ही बाब अत्यंत मोलाची आहे.

    कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (RUSA) अंतर्गत शिवाजी विद्यापीठाला अगदी अलीकडेच सेंटर फॉर नॅनो फॅब्रिक्स आणि सेंटर फॉर व्हीएलएसआय डिझाईन मंजूर झाली आहेत. त्यासाठी प्रत्येकी १.२० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. सेंटर फॉर नॅनो फॅब्रिक्समध्ये नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक कापड निर्मितीच्या अनुषंगाने संशोधन करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश केंद्रामध्येही या उपग्रह मालिकेचा एक रिसिव्हर बसविण्यात आला आहे आणि तो अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. हा रिसिव्हर बसविण्यात आलेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे.

    प्रारंभी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि प्रमुख पाहुणे डॉ. भीमराया मेत्री यांचे ग्रंथभेट, शाल व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी पदवी, पदविका व प्रमाणपत्रांच्या यादीचे वाचन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. आलोक जत्राटकर, धैर्यशील यादव व जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. तत्पूर्वी, सर्व मान्यवरांचे पसायदानाच्या साथीने दीक्षान्त मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आगमन झाले. ज्ञानदंड हाती घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दीक्षान्त मिरवणुकीचे नेतृत्व केले.समारंभास मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.