बंद

    एल सॅल्वाडोरच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: August 3, 2018

    मध्य अमेरिकेतील एल सॅल्वाडोर या देशाचे भारतातील नवनियुक्त राजदूत अरिएल जॅरेड आन्द्रादे गॅलिन्डो यांनी आज (दि. ३) राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली.

    एल सॅल्वाडोर भारताशी व्यापार संबंध वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून या संदर्भात उद्योग संस्थांशी चर्चा झाली असल्याचे अरिएल जॅरेड आन्द्रादे यांनी राज्यपालांना सांगितले. एल सॅल्वाडोर हा ६ दशलक्ष इतकी लोकसंख्या असलेला लहान देश असला तरीही आपल्या देशाच्या माध्यमातून भारताला दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३० देशांशी व्यापार वाढविण्याची संधी प्राप्त होऊ शकते, असे राजदूतांनी सांगितले.

    महराष्ट्रातील पहिल्या भेटीबद्दल राजदूतांचे अभिनंदन करताना सांस्कृतिक देवाण-घेवाण, विद्यार्थी–शिक्षक देवाण घेवाण, व्यापारी शिष्टमंडळ यांच्या परस्पर देशांना भेटी यातून भारत व एल सॅल्वाडोर संबंध दृढ होतील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. बैठकीला एल सॅल्वाडोरच्या मुंबईतील मानद वाणिज्यदूत पल्लवी कनोडिया या देखील उपस्थित होत्या.