बंद

    उच्च ध्येयासक्ती ठेवत युवापिढीने देशाला बलशाली बनवावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: February 11, 2020

                                                                                उच्च ध्येयासक्ती ठेवत युवापिढीने देशाला बलशाली बनवावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
                                                                                              डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा 60 वा दीक्षांत समारंभ

    औरंगाबाद, दि. 11 : माता, मातृभाषा आणि मातृभूमी प्रती आदर बाळगणे ही यशाची सुरुवात आहे, हे स्मरणात ठेऊन आपल्या नीतीमूल्यांप्रती प्रामाणिक राहत युवापिढीने उच्च ध्येयासक्ती ठेवून देशाला बलशाली बनवावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा 60 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’चे संचालक प्रा.अश्विनी कुमार नांगिया, कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. प्रवीण वक्ते, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा, कुलसचिव प्रा.डॉ.साधना पांडे, सर्व विद्या शाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा, विद्या परिषदेचे सदस्य यांची उपस्थिती होती.
    यावेळी राज्यपाल म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण देणारे देश हे प्रगती करतात, कारण मातृ भाषेबद्दल प्रत्येकाला एक जिव्हाळा असतो. त्यातून आपलेपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे कुणालाही मातृभाषेतून ज्ञान ग्रहण करणे हे तुलनेत लवकर शक्य होते, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपली माता, मातृभाषा आणि मातृभूमी याबद्दल कृतज्ञता भाव जपला पाहिजे. तो आपल्याला एक नैतिक बळ देतो, त्यातून इच्छित यश आपण प्राप्त करू शकतो हा विश्वास दृढ होतो, असे सांगून श्री.कोश्यारी म्हणाले, आज नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्यरित्या वापर करण्याचे आवाहन आपल्यासमोर आहे. कारण दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगची समस्या गंभीर बनत आहे. त्याचा यशस्वी सामना करण्यासाठी निसर्गाचे संरक्षण करणे अत्यावश्यक बनले आहे.

    आपण निसर्गाचे रक्षण केले तर तो आपले रक्षण करेल, हे लक्षात घेऊन युवापिढीने नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन, संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध व्हावे. सौर उर्जेचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. पाण्याचा नियोजन पूर्वक जपून वापर करणे, स्वच्छतेला प्राधान्य देणे या गोष्टी प्रत्येकाने कृतीत आणल्या तर त्यातून देशाच्या प्रगतीला आपल्यापरीने आपण सहाय्य करू शकतो, असे सांगून श्री.कोश्यारी म्हणाले, उच्च ध्येय ठेऊन युवापिढी प्रामाणिकपणे कृतीशील राहीली तर निश्चितच तुमची ध्येय तुम्ही यशस्वीरित्या साध्य करू शकाल. त्यासाठी आत्मविश्वास आणि नितीमुल्ये जपण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. बदलत्या काळात संधी विस्तारत असून आपल्या कौशल्यांचा विकास करत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाचा देशाचा आणि पालकांचा नावलौकिक वाढवण्याच्या ध्येयाने कृतीशील व्हावे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

    प्रमुख अतिथी श्री.नांगिया म्हणाले, जग हे झपाट्याने बदलत आहे. आज आपण सगळेच वैश्विक खेड्यात राहत आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रात बदल होत असून ते थेट आपल्या सर्वांच्या जगण्याला प्रभावित करत आहे. सेवा क्षेत्राचा विस्तार होत आहे. या बदलामध्ये आज आशियाई देश जगाच्या केंद्रस्थानी येत असून हे पहिल्यांदाच घडत आहे. या नव्या परिस्थितीचे तुम्ही युवा, विद्यार्थी साक्षीदार आहात. आपल्या शिक्षाणाचा एक टप्पा पूर्ण करून तुम्ही व्यावहारिक जगात दाखल होणार आहात. जिथे तुमच्या इच्छा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्या संधी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य, अद्ययावत तंत्रज्ञान, बदलत्या संकल्पना आत्मसात करणे गरजेचे आहे. आपल्या शैक्षणिक ज्ञानासह जगभरात उपलब्ध संधीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कौशल्याला स्वीकारून आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चौकस झाले पाहिजे, असे सांगून श्री.नांगिया म्हणाले विद्यार्थ्यांनी अष्टपैलू कौशल्य विकसित करत, संवाद कौशल्य वाढवण्यावर आणि विविध ज्ञानशाखांची अद्ययावत माहिती प्राप्त करण्यावर भर द्यावा. कारण युवापिढी ही बदल घडवण्याची क्षमता ठेवणारी असते. त्यादृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहून जगभरात आज एक प्रगत देश म्हणून वाटचाल करत असलेल्या भारताचे विद्यार्थ्यांनी यशस्वी प्रतिनिधीत्व करावे, असे आवाहन श्री.नांगिया यांनी केले.

    कुलगुरू डॉ. येवले यांनी यावेळी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संशोधन गुणवत्ता वाढीसाठी नविन अधिनियम विद्यापीठाने तयार केला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देत विद्यापीठ विविध स्पर्धांमध्ये, अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धांत, उपक्रमात उल्लेखनीय काम करत आहे. राज्यात विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजन विभाग राज्यात प्रथम स्थानावर आहे. भारतीय राज्य घटनेचा अभ्यास विद्यापीठांतर्गत सर्व पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याची माहिती कुलगुरू यांनी यावेळी दिली.

    कार्यक्रमाची सुरूवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी पदव्युत्तर प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर, पदवी एम. फिल, पीएच. डी आदींच्या शाखांच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये मानव्य विद्या व सामाजिक शास्त्र, वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र, आंतरविद्याशाखीय विद्या शाखा, पीएचडी संशोधक यांचा समावेश होता. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.