बंद

  वाईट प्रवृत्ती विरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

  प्रकाशित तारीख: February 21, 2020

  वाईट प्रवृत्ती विरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
  नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद

  नंदुरबार : महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी महिला सक्षमीकरणासोबत पुरुषांच्या मनात महिलांविषयी सन्मानाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. हिंगणघाटसारख्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील वाईट प्रवृत्तीविरोधात लढण्याचे सामर्थ्य युवकांनी आपल्यामध्ये निर्माण करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

  नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमाला खासदार हिना गावित, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, बार कौन्सिल सदस्य जयंत जायभावे, संस्थेचे संचालक परवेझ खान, प्राचार्य एन.डी. चौधरी आदी उपस्थित होते.

  रुची वळवीच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री.कोश्यारी म्हणाले, महिला अत्याचाराच्या घटना वेदनादायी आहेत. केवळ पोलीस दल त्या रोखू शकणार नाही. ही सामाजिक समस्या असल्याने सामाजिक जागृतीद्वारे या समस्येवर मात करता येईल. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा.

  कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. दुर्गम भागात पोषणयुक्त आहार देण्यात येत आहे. काही कालावधीनंतर या समस्येवर मात करता येईल, असे त्यांनी धीरसिंग पाडवी याच्या प्रश्नास उत्तर देताना सांगितले.

  सायली इंदिसने भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडल्यावर वकील झाल्यावर प्रामाणिकपणे काम करावे. स्वतः भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांना करू देणार नाही हा निश्चय करा, असे त्यांनी सांगितले.
  दानिश खाटीक याने लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा मांडला. त्यावर राज्यपाल म्हणाले, राजकारणात सुशिक्षित प्रतिनिधी येत आहेत. परंतु राज्य घटनेनुसार समानतेचे तत्व स्वीकारले असल्याने सर्वांना समान संधी मिळणे अपेक्षित आहे. कबीर, तुलसीदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, तुकडोजी महाराज यांनी पारंपरिक शिक्षण घेतले नव्हते तरी त्यांनी महान कार्य केले. निरक्षर असूनही काही व्यक्ती उत्तम कामगिरी करू शकतात. शिक्षणाचा संबंध अंतरज्ञानाशी आहे, त्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

  दीपिका पराडके हिच्या ऑनलाईनच्या मुद्याविषयी बोलताना वर्षभरात दुर्गम भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल, असे राज्यपाल म्हणाले. नव्या युगात अशा सुविधा दुर्गम भागात पोहोचणे आवश्यक आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. आदिवासी जनजागृतीसाठी आपण स्वतः ग्रामीण भागात जात असल्याचे त्यांनी किर्ती तडवीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
  यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी सेंट्रल किचनला भेट दिली. तेथील व्यवस्थेची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.