बंद

  12.02.2022 : राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

  प्रकाशित तारीख: February 12, 2022

  राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

  ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
  देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासात बजाज घराण्याचे आणि बजाज उद्योग समूहाचे योगदान फार मोठे आहे. बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपल्या कार्यकाळात बजाज उद्योग समूहाचा देशात तसेच बाहेर मोठा विस्तार केला.
  उद्योगाला आधुनिक व्यवस्थापन तंत्राची जोड देताना त्यांनी ‘बजाज’ हे ब्रँड नाव सर्वतोमुखी केले. देशाच्या उद्योग विश्वासमोरील समस्यांबद्दल आपली मते ते परखडपणे मांडत.
  महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात तसेच रोजगार निर्मितीत बजाज समूहाचे योगदान मोठे आहे. सामाजिक दायित्वाच्या बाबतीत देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाने आणि विशेषतः महाराष्ट्राने एक द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले आहे.
  श्री बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय तसेच बजाज परिवाराला कळवतो असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.